Soha and Saba Ali Khan on Saif Ali Khan: सैफ अली खान व त्याचे कुटुंब कायमच चर्चेत असते. सैफ अली खान विविध मुलाखतीत त्याच्याबद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल वक्तव्य करत असतो. आता सैफ अली खानची बहीण सोहा अली खानने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने त्यांच्या बालपणाबद्दल तसेच सैफ अली खानबद्दल वक्तव्य केले.

ऐषोआरामाच्या वातावरणात त्यांचे बालपण गेले, मात्र तरीही अनावश्यक खर्च करू नयेत अशी शिकवण त्यांना दिली गेली. सोहा अली खान म्हणाली की, तिचे वडील तिला मैत्रिणींच्या घरी जाऊ द्यायचे नाहीत, कारण गाडीच्या पेट्रोलचा खर्च त्यांना महाग वाटायचा.

“मी त्यांना एखाद्या मैत्रिणीच्या घरी जाण्याची परवानगी मागायचे, तेव्हा ते मला…”

सोहा व तिची बहीण सबा यांनी नुकतीच नेहा धुपिया व अंगद बेदी यांच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती म्हणाली, “आम्हाला लहानपणी कधीही राजेशाही वागणूक मिळाली नाही. आमचे वडील आमच्यासाठी लाईट बंद करण्यासाठी एका कागदावर मेसेज लिहायचे. कारण लाइट बिल किती येतं, पेट्रोल किती महाग आहे याची त्यांना पूर्ण जाणीव होती. मी त्यांना एखाद्या मैत्रिणीच्या घरी जाण्याची परवानगी मागायचे, तेव्हा ते मला पाठवायचे नाहीत. ते म्हणायचे की पेट्रोल खूप महाग आहे.”

सबाने बालपणी किती पॉकेटमनी मिळायचा याबद्दल सांगितले. तिला आणि तिच्या बहिणीला पॉकेटमनी म्हणून १०० रुपये मिळायचे. सैफला किती पैसे मिळायचे, असे विचारल्यानंतर सबा म्हणाली की, तेव्हा तो इंग्लंडमध्ये शिक्षण घेत होता. यावर सोहा गमतीने म्हणाली की तो पैसे चोरायचा. सबा यावर हसत म्हणाली, “तो माझ्याच पाकिटातून पैसे चोरायचा आणि मला ते रक्षाबंधनला गिफ्ट म्हणून द्यायचा.”

दरम्यान, याच मुलाखतीत सबाने तिने लग्न का केले नाही, याबद्दलही सांगितले. सोहा व सैफ अली खान यांनी बॉलीवूड सिनेमांत काम करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोहा पॉडकास्ट, मुलाखती या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येते, तर सैफ अली खान विविध सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो.