Sohail Khan on father Salim Khan health and hospitalisation: काही दिवसांपूर्वी सलीम खान यांची प्रकृती बिघडली होती. त्यावेळी बराच काळ ते दवाखान्यात होते. आता त्यांचा मुलगा सलमान खानचा भाऊ सोहेल खानने त्याबद्दल वक्तव्य केले आहे. अभिनेता अमेझॉन प्राइमवरील अलायन्स या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. तो वडील सलीम खान यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाला आहे, याबद्दल जाणून घेऊ…
“माझी मुलं अजून…”
सोहेल शोमधील इतर स्पर्धकांशी बोलताना म्हणाला, “माझा बहुतांश वेळ आई-वडिलांबरोबर जातो. माझ्या मते, एखाद्या व्यक्तीला आपण सर्वात मौल्यवान जी गोष्ट देऊ शकतो ती म्हणजे वेळ आहे. माझी मुलं अजून लहान आहेत. त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. पण माझे आई-वडील आता वयस्कर झाले आहेत, त्यामुळे मला त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे.”
पुढे तो म्हणाला, “काही आठवड्यांपूर्वी माझ्या वडिलांची प्रकृती बिघडली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ते सेमीकोमामध्ये गेले होते. त्या काळात मी सतत त्यांच्याबरोबर रुग्णालयातच होतो. डॉक्टरांनी सांगितले होते की, कदाचित त्यांना आपण गमावू शकतो. माझे आई-वडील मला खूप जवळचे आहेत. जर माझ्या वडिलांना काही झाले असते, तर मी स्वतःला कसे सावरले असते, याची मला कल्पनाही करू शकत नाही. माझ्यासाठी माझे आई-वडील म्हणजेच माझे संपूर्ण आयुष्य आहेत; तेच माझे सर्वस्व आहेत.”
मंगळवारी सोहेल खानने अमेझॉन प्राइमच्या अलायन्स या शोमधून ओटीटी विश्वात पदार्पण केले. या नवीन प्रवासाबद्दल सोहेल म्हणाला, “माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत, पण जे घडून गेले त्याबद्दल मी कधीही तक्रारी करत बसत नाही. जे झाले ते झाले, मी पुढे जाण्यावर विश्वास ठेवतो. मला लोकांना समजून घ्यायला खूप आवडते. ज्यांना वाटते की मी खूप शांत आहे किंवा स्वतःमध्येच राहतो, त्यांनी माझ्याशी भांडण्याचा प्रयत्न करू नये. नाहीतर त्यांना खरा सोहेल खान पाहायला मिळेल.”
अलायन्स या रिअॅलिटी शोमध्ये अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी झाले आहेत. निती टेलर, मिनी माथूर, डेझी शाह असे अनेक कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. दरम्यान, शोचे होस्टिंग अभिनेता कुणाल खेमू करत आहे.
