Sohail Khan physical harassment : सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता व निर्माता सोहेल खान सध्या ‘अलायन्स’ या ओटीटी शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. सोहेल खानसह त्याची एक्स पत्नी सीमा सजदेह सहभागी झाल्याने हा शो चर्चेमध्ये आला आहे. सोहेल व सीमा यांचा घटस्फोट का झाला होता, याचे कारणही त्याने स्पष्टपणे सांगितले होते. घटस्फोटानंतर आता सोहेलने लहानपणी त्याच्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. अनेक वर्षे भीतीमुळे याबद्दल घरी सांगितलेच नसल्याचे सोहेल खानने सांगितले आहे.
‘अलायन्स’ या शोमध्ये अली गोनी, अर्सलान गोनी आणि रूही दोसानी यांच्याशी संवाद साधताना सोहेल खानने बालपणीचे अनुभव शेअर केले. लहानपणी त्याच्यावर शारीरिक अत्याचार झाला होता आणि भीतीमुळे त्याने अनेक वर्षे कोणालाही याबद्दल सांगितलं नव्हतं, असा खुलासा केला आहे. खूप वर्षांनंतर त्याने याबाबत घरामध्ये त्या घटनेबद्दल सांगितले होते. सोहेलने रॅगिंगसारख्या प्रकारांचा तीव्र शब्दांत निषेध केला असून अशा घटनांचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे मत व्यक्त केले.
सोहेल खानवर झाले होते लैगिक अत्याचार
सोहेल खान म्हणाला, “मी लहान असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला होता आणि मी ते वर्षानुवर्षे मनातच दाबून ठेवलं होतं. मी मोठा झाल्यानंतर खूप हिंमत दाखवून वडिलांना याबद्दल सांगितलं होतं. मी म्हणालो, ‘बाबा, माझ्याबरोबर हे असं घडलं होतं.’ ते म्हणाले, ‘बाळा, तू हे एवढ्या वर्षे लपवून का ठेवलं होतं?” यावर मी म्हणालो, त्यासाठी माफ करा, पण हे सांगायला खूप लाज वाटत होती. कारण माझी काहीच चूक नव्हती. पण, त्या वयामध्ये तुम्हाला स्वतःचीच लाज वाटत असते.
पुढे तो म्हणाला, “म्हणून मी माझ्या मुलांना खूप वेळा सांगत असतो की, तुमच्याबरोबर जर काही चुकीचं होतं असेल तर मला आधी सांगा. चुकीचं काहीही सहन करू नका. मी रॅगिंगच्या पूर्णपणे विरोधात आहे. मी युहान आणि निर्वाण या माझ्या दोन्ही मुलांना हे सांगून ठेवलं आहे की, जर कोणीही तुम्हाला घाबरवत असेल किंवा काही चुकीचं करत असेल तर मला सांगायला अजिबात संकोच करू नका,”
Sohail Khan revealed he was sexually assaulted at a young age is heartbreaking. PPL may never have liked him as an actor, but this took immense courage to share.Parents shd create a safe space where children feel comfortable speaking up about anything without fear.#TheAlliance… pic.twitter.com/3OrMGUiWq2
— M@T@T@?♀️? (@hakuna784) July 16, 2026
सोहेल खानला मुलाचे नाव ठेवायचे होते ‘राम’
सोहेल खानला त्याच्या मुलाचं नावं हे ‘राम’ ठेवायची इच्छा होती. तो म्हणाला, “जेव्हा सीमा निर्वाणच्या वेळी गरोदर होती, तेव्हा मुलगा झाला तर मी नाव ठेवणार होतो. मला माझ्या मुलाचं नाव राम म्हणजे राम खान ठेवायचं होतं. पण, जेव्हा माझा मोठा मुलगा जन्माला आला, तेव्हा सीमा बेशुद्ध अवस्थेमध्ये होती. नंतर सीमानं माझ्याकडे बघून विचारलं, ‘निर्वाण कसा आहे?’ मला वाटलं, ‘अरे, हिनं तर त्याचं नाव आधीच ठेवलंय’ आणि त्याच क्षणी, तिच्या तोंडातून निर्वाण हे नाव अशा प्रकारे बाहेर पडलं की, मला ते बदलायची इच्छाच झाली नाही.”
