Why Sohail Khan Divorce with Seema Sajdeh : सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता सोहेल खान हा सध्या ‘अलायन्स’ या ‘रिॲलिटी’ शोमध्ये सहभागी झाला आहे. सोहेल हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रिअॅलिटी शोमध्ये सोहेलची वाईल्डकार्ड ‘एन्ट्री’ झाल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. सोहेलनंतर त्याची एक्स पत्नी सीमा सजदेह हीदेखील शोमध्ये आल्याने चर्चा रंगली. २०२२ मध्ये सोहेल आणि सीमा यांनी घटस्फोट घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा शोमध्ये एकत्र आल्याने त्यांची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. या शोदरम्यान सोहेलने आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत भाष्य करीत सीमा आणि त्याचा घटस्फोट नेमका का झाला, याचा खुलासा केला आहे.
‘अलायन्स’मध्ये सोहेल खान व सीमा सजदेह हे अनेकदा त्यांच्या नात्यावर आणि कुटुंबावर बोलताना दिसून येतात. दरम्यान, सोहेल खानने पहिल्यांदाच त्यांच्या घटस्फोटाचे कारण सांगितले आहे. तसेच त्या दोघांना पुन्हा एकदा एकत्र आणल्याबद्दल सोहेलने ‘अलायन्स’ या शोचे आभार मानले आहेत. त्याने घटस्फोटाची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली. सीमाने सुद्धा सोहेल हा तिचा एकमेव आधार असल्याचे सांगितले आहे.
“माझ्या वागण्यामुळे मी…” – सोहेल खान
दरम्यान, शोमध्ये सोहेल हा सीमासाठी चहा बनवत होता यावेळी निखिल चिनाप्पाने विचारलं, “एक स्त्री घर तयारही करु शकते आणि उद्ध्वस्तही करू शकते. तुमच्या कुटुंबात यासाठी जबाबदार कोण होतं?” यावर सोहेल खान म्हणाला, त्यावेळी माझी वेळ चांगली नव्हती आणि माझी मानसिक स्थितीही वाईट होती. माझ्या वागण्यामुळे मी जिच्यावर जीवापाड प्रेम करत होतो, तिला गमावलं,”
सोहेल पुढे म्हणाला, “सीमा माझ्या दोन सुंदर मुलांची आई आहे, त्यामुळे माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेमापेक्षा जास्त आदर आहे. हा शो माझ्यासाठी नेहमीच खास राहील. जरी आम्ही वेगळं झालो असलो तरी, या शोनं आम्हाला पुन्हा एकमेकांशी बोलण्याची आणि मनातील गोष्टी जाणून घेण्याची संधी दिली. आमच्यातील एक नातं कुठेतरी तुटलं होतं आणि या शोमुळे आम्हाला ते पुन्हा जोडता आलं.”
सोहेल खानने झैदशी बोलताना सीमाकडे अजूनही घराच्या चाव्या असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला, “सीमा आठवड्यातून तीन वेळा आमच्या घरी येते. मुलांबरोबर वेळ मिळावा म्हणून ती येत असते. आमची मुलं माझ्यासह माझ्या घरामध्ये राहतात आणि सीमाकडे अजूनही घराच्या चाव्या आहेत.”
सीमा सजदेह आणि सोहेल खान यांनी १९९८ मध्ये प्रेमविवाह केला होता. सोहेलचा पहिला चित्रपट ‘प्यार किया तो डरना क्या’ प्रदर्शित झाला, त्याच दिवशी दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केल्याची चर्चा सिनेविश्वामध्ये रंगली होती. सीमा व सोहेल यांना दोन मुलं असून निर्वाण व योहान अशी त्यांची नावं आहेत. मात्र, तब्बल दोन दशकं संसार केल्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सीमा व सोहेल यांनी २०२२ मध्ये घटस्फोट घेतला. वैवाहिक नातं संपलं असलं तरी मुलांसाठी त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवले आहेत.
