Sohail Khan Weight Loss Transformation Truth : सलमान खानचा भाऊ आणि अभिनेता व निर्माता सोहेल खान हा त्याच्या वजनामुळे चर्चेत आला आहे. ‘द अलायन्स’ शोमध्ये सामील झाल्यानंतर त्याचं वजन खूप कमी झाल्याचं दिसून आले. सोहेलच्या वजनात आणि चेहऱ्यामध्ये झालेला मोठा बदल पाहून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. त्यानं ‘ओझेम्पिक’सारख्या औषधांचा वापर केला आहे का किंवा त्याला काही आजार झाला आहे का, अशी चिंता नेटकरी व्यक्त करीत होते. मात्र, आता यावर सोहेल खाननं स्वतः स्पष्टीकरण देत वजन कमी होण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सोहेलनं वजन कमी झाल्याबद्दल सांगितलं. ‘द अलायन्स’मध्ये सहभागी झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये त्याला अडचणी आल्याचे सांगितले. सोहेल म्हणाला, “खरं तर एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. त्यामुळे सुरुवातीला मला कोंडल्यासारखं वाटत होतं. शोमध्ये पहिल्याच आठवड्यात मला पोटाच्या संसर्गाचाही त्रास झाला होता. यावेळी इतर स्पर्धकांनी माझी जी काळजी घेतली आणि मला प्रेम दिलं, त्यामुळे तरी मी पाच आठवडे त्या घरात राहू शकलो.”

ओझेम्पिक नाही किंवा फॅट बर्नर्स घेऊन नाही तर…

पुढे सोहेल खानने सांगितलं, “आजारामुळे त्याला खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही बदल करावा लागला. टास्कमध्ये सहभागी होण्यासाठी आणि शोमध्ये शेवटपर्यंत राहण्यासाठी त्यानं जेवणावर नियंत्रण ठेवलं होतं. सोहेल म्हणाला, “मी काय खातो यावर नियंत्रण ठेवण्याची गरज होती. कारण- मला खेळातील टास्क पूर्ण करायचे होते. शेवटच्या दिवसांपर्यंत मला माझ्या नव्यानं झालेल्या या मित्रांबरोबर वेळ घालवायचा होता. आताही यापुढे ते कायम माझ्या आयुष्यामध्ये असणार आहेत. ते माझ्यासाठी माझं नवीन कुटुंब आहे. त्यामुळे ओझेम्पिक नाही किंवा फॅट बर्नर्स घेऊन वजन कमी केलेलं नाही, तर माझ्या मित्रांकडून मला खूप प्रेम मिळालं आहे,”

सोहेल खान ‘द अलायन्स’मध्ये झाला होता सहभागी

दरम्यान, ‘द अलायन्स’मध्ये सलमान खान हा सोहेल खानला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी सोहेलनं तब्बल १२ किलो वजन कमी केल्याचं भावाला सांगितलं होतं. त्यामुळे त्याच्या बदललेल्या लूकची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती. सोहेल खानचे वर्षभरापूर्वीचे फोटो आणि आताचे फोटो, अशी तुलना केली जात होती. पण, आता सोहेल खाननं स्वतः याचं कारण स्पष्ट केलं आहे. सोहेल खानबरोबर त्याची एक्स पत्नी सीमा सजदेहसुद्धा सहभागी झाली होती. सीमा व सोहेलमध्ये पुन्हा निर्माण झालेली मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.