एकेकाळची बॉलीवूड अभिनेत्री आणि सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने चॉकलेट डे च्या निमित्ताने तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. बॉलीवूडचे दिग्गज दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्याबरोबर झालेल्या एका भेटीची आठवण तिने सांगितली. राजेश खन्ना यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडला होता. इतक्या वर्षांनंतरही ही गोड आठवण मनात तितकीच ताजी आहे, असं तिने सांगितलं.
आयएएनएसशी बोलताना सोमी अली म्हणाली, “हो, माझी त्यांच्याबरोबरची एक अतिशय खास आठवण आहे. मी साधारण सात वर्षांची असताना, दिग्गज अभिनेते राजेश खन्ना यांना भेटले होते. ते खूप प्रेमळ होते. त्यांनी माझ्या कपाळावर किस केले आणि मला एक चॉकलेट बार दिला होता. मला तो क्षण अजूनही स्पष्ट आठवतो. तो एक जादूई क्षण होता. एका लहान मुलीसाठी, त्यांच्यासारख्या सुपरस्टारला भेटणं आणि त्यांच्याकडून चॉकलेट मिळणे हे खरंच खूप अविस्मरणीय होतं.”
सोमी अलीला आवडतात चॉकलेट्स
सोमी अली पुढे म्हणाली, “मला चॉकलेट प्रचंड आवडतं. मी सहसा डाएटमुळे फार चॉकलेट खात नाही, पण शुक्रवार हा माझा ‘चीट डे’ असतो आणि त्या दिवशी मला डार्क चॉकलेट खायला खूप आवडतं. ते जास्त गोड नसलं तरी खूप चविष्ट असतं आणि ते खाल्ल्यावर मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. मला जास्त दूध असलेले किंवा अतिशय गोड चॉकलेट आवडत नाही.”
सोमी अलीने आमिर खानसाठी केलेली पोस्ट
आमिर खानने नुकतंच तिसरं लग्न केलं. त्या निमित्ताने सोमी अलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती.
गौरी आणि आमिर,
प्रेम हे कोणत्याही कॅलेंडरनुसार चालत नाही. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर सोबती मिळणं, हे वयाच्या २० व्या वर्षी जोडीदार मिळण्याइतकंच सुंदर असतं. स्वतःसाठी आनंद निवडण्यास कधीही उशीर होत नसतो. प्रेमाचं स्वागत करणाऱ्या हृदयाचं नेहमी सेलिब्रेशन केलं पाहिजे, त्यावर टीका करू नये. वय हे वर्षांमध्ये मोजलं जातं, पण प्रेम हे गोड क्षणांमध्ये मोजलं जातं.
तुम्हा दोघांचं मनापासून अभिनंदन!
काही लोक योग्य व्यक्तीच्या शोधात संपूर्ण आयुष्य घालवतात. जर हा प्रवास कोणत्याही वयात लग्नापर्यंत पोहोचत असेल, तर त्याला उशीर झाला असं म्हणता येणार नाही. खरं तर तीच लग्नाची अगदी योग्य वेळ असते. आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू करण्याचं धाडस हे इतरांना प्रेरणा देणारं असतं.
तुम्हा दोघांनाही आनंद, हास्य आणि कम्पॅनियनशिपने भरलेल्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सर्वोत्तम लव्ह स्टोरीची ओळख ती कधी सुरू झाली ही नसते, तर ती कहाणी तुम्ही किती मनापासून जगलात यावरून होते. तुमच्या वयावरून टीका करणाऱ्यांना एक दिवस नक्कीच समजेल की, आनंदी राहण्यासाठी कोणतीही शेवटची तारीख नसते. वयाने मोठे होणं अपरिहार्य आहे, पण सोबत जगणं ही एक मौल्यवान भेट आहे. आयुष्यातील सर्वात मोठी अचिव्हमेंट ही कमी वयात लग्न करणं नसून, ज्याच्यासोबत तुम्हाला म्हातारं व्हायला आवडेल अशी व्यक्ती शोधणं ही आहे, अशी पोस्ट सोमी अलीने केली होती.
