Sonakshi Sinha :काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादुकोणने आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम करणार असल्याचं स्पष्ट केलं. पण, तिच्या या मागणीनंतर बॉलीवूडसह मराठी मनोरंजनविश्वातही चर्चा सुरू झाली. आठ तास काम करणं शक्य नाही, कलाकारांनीसुद्धा वाढीव कामासाठी तयार राहायला हवं असं काहींचं म्हणणं आहे; तर कोणी किती तास काम करावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असल्याचंही मत काहींनी व्यक्त केलं. दीपिकाच्या या मागणीला अनेक अभिनेत्रींनी पाठिंबा दिला आहे.
अशातच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने या प्रकरणी तिचं मत व्यक्त केलं आहे. तसेच आठ तासांच्या कामाच्या शिफ्टसाठी सोनाक्षीने दीपिकाला पाठिंबा दिला आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी सिन्हाने दीपिकाच्या आठ तासांच्या कामाची मागणी मान्य नसल्याने चित्रपटातून एक्झिट घेतल्याचं कारण अगदी योग्य असल्याचे म्हटलं.
याबद्दल सोनाक्षी म्हणाली, “दीपिकाने खरोखरच ‘स्पिरीट’ चित्रपटातून एक्झिट घेतली आहे की नाही हे मला माहीत नाही. पण तिने एक्झिट घेतली असेल तर ते अतिशय योग्य कारण आहे. मी अशा अनेक पुरुष कलाकारांबरोबर काम केले आहे, जे फक्त आठ तास शूटिंग करतात. मग महिला कलाकारांसाठी वेगळे नियम का असावेत? आठ तासांत काम पूर्ण करता येईल असं वेळापत्रक बनवावे.”
सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्राम पोस्ट
ती पुढे म्हणाली की, “मी या इंडस्ट्रीत १५ वर्षांपासून आहे आणि मी अशा लोकांबरोबर काम केले आहे, जे माझ्यापेक्षा कमी तास काम करतात आणि काही जण माझ्यापेक्षा जास्त कामही करतात.” यानंतर सोनाक्षी म्हणाली, “जर मी एखादा असा चित्रपट करत असेल, ज्यात मला अत्यंत फिट राहण्याची आवश्यकता आहे, तर मग मला त्यासाठी जिममध्ये जाणं गरजेचं आहे आणि जर मी शूटिंगसाठीच १२ ते १४ तास सेटवर असेल तर मी माझ्या भूमिकेसाठीची मेहनत किंवा व्यायाम करू शकणार नाही.”
याचबद्दल सोनाक्षीने पुढे असं म्हटलं, “पण, मला माझ्या भूमिकेसाठी वेगळी मेहनत करायची नसेल, मला जिममध्ये जाऊन व्यायाम करायचा नसेल; तर मग मी सेटवर १२ तास आनंदाने काम करेन. पण जिथे आवश्यक नसेल तिथे कामाच्या पद्धतीत थोडे बदल नक्कीच करता येतील आणि या बदलाबाबत मला खात्री आहे.”
दीपिका पादुकोण इन्स्टाग्राम पोस्ट
दीपिका पादुकोणने काही दिवसांपुर्वी ‘स्पिरीट’ चित्रपटातून एक्झिट घेतल्याची घोषणा केली. दीपिकाने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्याबरोबर आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम करण्याची अट घातली होती. ज्यावर एकमत न झाल्याने अभिनेत्रीने हा चित्रपट सोडला. दीपिकाच्या ‘स्पिरीट’मधील एक्झिटनंतर कामाचे तास आणि काम करण्याच्या पद्धतीबद्दलच्या अनेक चर्चा होताना दिसत आहेत.
दरम्यान, सोनाक्षी सिन्हाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री येत्या २७ जून २०२५ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘निकिता रॉय’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तिचा भाऊ कुश सिन्हा करत आहे. हा एक भयपट आहे, ज्यामध्ये अर्जुन रामपाल आणि परेश रावल यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.