Shatrughan Sinha Reaction on Sonakshi wedding : सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqubal) यांनी जून महिन्यात आंतरधर्मीय लग्न केलं. दोघांनी कधीच त्यांच्या नात्याची सार्वजनिकरित्या कबुली दिली नव्हती, त्यामुळे त्यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली. जून महिन्यात त्यांनी लग्न केलं तेव्हा तिच्या निर्णयावर तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि तिचे भाऊ लव आणि कुश नाराज असल्याचं म्हटलं गेलं. लग्नातील अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यात तिचे भाऊ दिसत नव्हते. सोनाक्षीच्या आई-वडिलांनी मात्र दोघांच्या लग्नाला आणि रिसेप्शनला हजेरी लावली होती.
सोनाक्षीने ‘झूम’ला नुकत्याच दिलेल्या दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाच्या निर्णयावर पालकांची प्रतिक्रिया काय होती, याबद्दल खुलासा केला. वडिलांविषयी बोलताना ती म्हणाली, “आमचे सर्व मित्र-मैत्रिणी आणि आमच्या कुटुंबाला आमच्या नात्याविषयी अनेक वर्षांपासून माहिती होती.”
सोनाक्षीने सांगितली वडिलांची प्रतिक्रिया
ती पुढे म्हणाली, “मी लग्नाचा निर्णय सांगितल्यावर माझे वडील खूप आनंदी होते. त्यांनी म्हटलं, ‘जब मियाँ बीवी राज़ी तो क्या करेगा काजी (जर नवरा-बायको लग्नासाठी तयार असतील, तर त्यांना कोण अडवणार)’ ते झहीरला अनेक वेळा भेटले होते आणि त्यांना झहीर खूप आवडतो. त्यांचे वाढदिवस मागेपुढेच असतात. माझ्या वडिलांचा वाढदिवस ९ डिसेंबरला आणि झहीरचा १० डिसेंबरला असतो, त्यामुळे त्या दोघांमध्ये खूप समानता आहे.”
झहीर सासऱ्यांबद्दल काय म्हणाला?
झहीरनेही या मुलाखतीत सासरे शत्रुघ्न सिन्हा यांच्याबद्दल आपले मत मांडले. तो म्हणाला, “मला त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल खूप आदर वाटतो. जेव्हा ते बोलतात, तेव्हा त्यांच्याकडील माहिती ऐकून आश्चर्य वाटते. त्यांच्याबरोबर फक्त एक-दोन तास बसलो तरी असे वाटते की आपण एखाद्या विद्यापीठात शिकत आहोत.”
हेही वाचा…मलायका अरोराच्या वडिलांचे निधन, मैत्रिणीसाठी करीनाने पुढे ढकलली तिची सगळी कामं
सोनाक्षी सिन्हा आईच्या प्रतिक्रियेबद्दल म्हणाली…
सोनाक्षीने तिच्या आई पूनम सिन्हा यांच्या प्रतिक्रियेबद्दल सांगितलं. ती म्हणाली, “माझ्या आईला आमच्या नात्याबद्दल माहिती होती. ती पहिली व्यक्ती होती, जिच्याशी मी या विषयावर मनमोकळेपणाने बोलले होते. माझ्या आई-वडिलांचा प्रेमविवाह झाला असल्याने त्यांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला.”
सात वर्षांच्या नात्यानंतर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी २३ जून रोजी मुंबईत सोनाक्षीच्या घरी नोंदणी पद्धतीने लग्न केले. त्यानंतर भव्य रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती, ज्यात सलमान खान, हुमा कुरेशी, रेखा, काजोल आणि इतर अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. लग्नानंतर सोनाक्षी व झहीर विविध ठिकाणी फिरायला जाताना दिसत आहेत. त्यांच्या लग्नातील काही सुंदर क्षण हे दोघे शेअर करत असतात. त्यांच्या फोटोंवर चाहते लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव करत असतात.