Sonakshi Sinha Reveals Why She Tried Couples Therapy With Zaheer Iqbal : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी २३ जून २०२४ मध्ये लग्न केलं. दोघांनी ७ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. या जोडीच्या लग्नानंतर अनेक चर्चांनाही उधाण आलं होतं. पण, या दोघांनीही त्याकडे लक्ष न देता घरच्यांच्या साक्षीने साध्या पद्धतीने लग्न केलं.
सोनाक्षी व झहीर नुकतेच त्यांच्या मुंबईतील वांद्रे येथील घरात शिफ्ट झाले. दोघेही बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक आहेत. पण, कितीही हुशार, समजुतदार किंवा शांत स्वभावाची माणसं असली तरी कपल म्हटल्यावर नात्यात छोटे-मोठे उतार चढाव येत असतात आणि असंच काहीसं सोनाक्षी व झहीर यांच्याबद्दलही आहे.
सोनाक्षी सिन्हाची प्रतिक्रिया
सोनाक्षी सिन्हाने नुकताच सोहा अली खानशी संवाद साधला. यावेळी तिने तिचा नवरा, रिलेशनशिप याबद्दल सांगितलं आहे. सोहा अली खानने यावेळी तिला तिच्या सात वर्षांच्या झहीरबरोबरच्या रिलेशनशिपमध्ये कधी अस्वस्थ झाल्यासारखं वाटलं का आणि आता लग्नानंतर नात्यात काही समस्या जाणवत आहेत का असं विचारल्यानंतर सोनाक्षी म्हणाली, “नाही, मला वाटतं प्रत्येक व्यक्तीच्या आणि नात्याच्या गोष्टी वेगळ्या असतात; मला तीन वर्षांनंतर असं वाटलं.”
सोनाक्षी याबद्दल पुढे म्हणाली, “मला आमच्या नात्याला तीन वर्ष पूर्ण झाली तेव्हा अशी भावना जाणवली. जिथे आम्हाला एकमेकांचा राग यायचा आणि आम्ही रागवायचो, आम्हाला एकमेकांचा दृष्टिकोन समजून घ्यायला जमायचं नाही. पण, आम्हाला मनातून ही जाणीव होती की आम्हाला हे नातं टिकवायचं आहे. आम्ही यासाठी कपल थेरिपीसुद्धा घेतल्या आणि ही झहीरचीच कल्पना होती.”
सोनाक्षी पुढे म्हणाली, “काहीही झालं तरी मला हे नातं टिकावं असं वाटतं, त्यामुळे मी याबद्दल ऐकून होते आणि मला त्याबद्दल काहीही संकोच नव्हता. मला खूप आनंद आहे याचा. आम्ही दोन थेरिपी घेतल्या आणि त्यातच आम्ही पुन्हा मार्गावर आलो होतो, यामुळे आम्हाला एकमेकांना समजून घेण्यात मदत झाली की जे ते विचार करतात तेच त्यांना हवं असतं असं काही नसतं.”
सोनाक्षीला पुढे नात्यामध्ये कोणत्या गोष्टींसाठी तू कधीही तडजोड करत नाही असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “मला वाटतं आदर करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे दोघांकडूनही व्हायला हवं. मी माझ्या जोडीदाराचा आदर केलाच पाहिजे आणि जोडीदारानेही माझा आदर करावा.”
सोनाक्षी पुढे झहीरबद्दल म्हणाली, “मला वाटतं तो सगळ्यांचाच खूप आदर करतो. मला त्याचा आत्मविश्वास ही सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट आहे. तो माझ्या भावनांची काळजी घेतो आणि हे खूप महत्त्वाचं आहे.”
