Sonakshi Sinha Diet Routine : २०१० मध्ये ‘दबंग’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा. ‘दबंग’नंतर तिने ‘राऊडी राठोड’, ‘लुटेरा’, ‘आर राजकुमार’, ‘मिशन मंगल’ या चित्रपटांमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सोनाक्षी सिन्हाचे वजन जवळपास ९५ किलो होते. नंतर तिने हे वजन कमी केले.
२०१८ मध्ये ‘व्होग इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षीने तिच्या व्यायामाचे वेळापत्रक आणि डाएट बद्दल सांगितले होते, ज्यामुळे तिला वजन कमी करण्यात मदत झाली. एका जुन्या मुलाखतीत सोनाक्षीने तिच्या व्यायामाबद्दल सांगितले होते. अभिनेत्री रोज २० ते २५ मिनिटे वेगाने चालते. तसेच गेल्या काही वर्षांपासून ती न चुकता ‘पिलाटेस’ (Pilates) करते. अशातच आता तिने तिचे सध्याचे डेली रूटीन शेअर केले आहे.
अभिनेत्री असण्याबरोबर सोनाक्षी यूट्यूबवरसुद्धा तितकीच सक्रीय असते. यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून सोनाक्षी तिच्या दैनंदिन आयुष्यातील अपडेट्स शेअर करत असते. अशातच नुकत्याच एका व्हिडीओत तिला काही चाहत्यांनी तिच्या डेली रूटीनबद्दल तसेच स्कीन केअरबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा तिने चाहत्यांच्या डेली रूटीन संदर्भातील प्रश्नांना उत्तरे दिली.
या प्रश्नाचे उत्तर देत सोनाक्षी म्हणाली, “मी रोजच्या जेवणात बाजरी खाते, तसंच मला डाळीही आवडतात. त्याचबरोबर माझ्या रोजच्या जेवणात अनेक भाज्यासुद्धा असतात. मला भाज्या खायला खूप आवडतात. यात पडवळ, कोबी, गवार अशा अनेक भाज्या असतात. प्रोटीनसाठी मी चिकन खाते. दुपारच्या जेवणात तीन चिकन पिस आणि रात्रीच्या जेवणात तीन चिकन पिस… अशा पद्धतीने मी प्रोटीन्सचा बॅलन्स करते. कधीकधी रात्रीच्या जेवणात मी फक्त चिकन डाळ आणि भाजीच खाते. हे पोट भरण्यासाठी पुरेसे आहे. यामुळे काही काळ भूक लागत नाही.”
यापुढे तिने स्वत:चे स्कीन केअर रूटीन शेअर केलं. अभिनेत्री म्हणाली, “मी साखर आणि मैद्याचे पदार्थ खाणे बंद केलं आहे. यामुळे तुमच्या त्वचेवर परिणाम होतो. साखर आणि मैदा पूर्णपणे बंद केल्याचा फरक मला दिसत आहे. कोरडी त्वचा असणे सामान्य आहे. पण यासाठी मी स्वत:ला हायड्रेटेड ठेवते. मी खूप जास्त पाणी पिते.” यानंतर तिने एक प्रोडक्ट वापरण्याचा सल्ला दिला आहे. अभिनेत्री स्वत:च्या त्वचेसाठी BioDerma वापरते. कोरड्या त्वचेसाठी ती सकाळी आणि रात्री हे प्रोडक्ट वापरत असल्याचे सांगते.
सूचना : ही माहिती अभिनेत्रीच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित असून केवळ माहितीसाठी देण्यात आली आहे. कोणताही डाएट प्लॅन किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
