Sonakshi Sinha BJP IT Cell Troll Shatrughan Sinha : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर बेधडक मतं मांडताना दिसत आहे. सीजेपी आंदोलनादरम्यान तिने उघडपणे विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला होता. सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा हे राजकारणामध्ये सक्रिय असून आता सोनाक्षी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणामध्ये प्रवेश करणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबद्दल आता शत्रुघ्न सिन्हांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सोनाक्षी सिन्हा राजकारणात येणार का?

एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांची मुलगी सोनाक्षीच्या राजकीय भूमिकांबाबत मत व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी सोनाक्षी विद्यार्थ्यांसाठीही ठामपणे भूमिका घेताना दिसून आली होती. सीजेपी आंदोलनावेळी सोनाक्षीने ज्या पद्धतीने पाठिंबा दिला, त्यावरून ती भविष्यात राजकारणात प्रवेश करेल असं वाटतं का? असा प्रश्न शत्रुघ्न यांना विचारण्यात आला, यावर त्यांनी मुलीचं तोंडभरून कौतुक केलं.

शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “याबद्दल मी काही सांगू शकत नाही, पण याबद्दल मीसुद्धा तिला आधी विचारायचो. मी एवढंच म्हणू शकतो की ती एका अत्यंत कर्तबगार वडिलांची अत्यंत कर्तबगार मुलगी आहे.”

भाजप करतंय सोनाक्षी सिन्हाचं ट्रोलिंग?

सोनाक्षीला सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांवरही शत्रुघ्न सिन्हा यांनी टीका केली. ते म्हणाले, “ट्रोल करणारे अनेक लोक पेड ट्रोलर्स (पैसे घेऊन) आहेत. भाजपाचे जे आयटी सेल आहे, ते सोनाक्षीविरोधात ट्रोलिंग करवून घेते. हे ऑर्गेनिक ट्रोलिंग नाही, हे पेड ट्रोल्स आहेत, ज्यांना काय बोलायचं हेही माहीत नसतं. पण, सोनाक्षीने एक चांगली गोष्ट सांगितली आहे की ती हे सर्व पाहतच नाही.”

‘सिस्टम’मध्ये झळकली होती सोनाक्षी

सोशल मीडियावर सक्रिय असलेली सोनाक्षी सिन्हा अनेकदा राजकीय विषयांवर भूमिका मांडताना दिसून येते. तिने दिल्लीतील नीट पेपरफुटी प्रकरणाच्या आंदोलनावर भूमिका घेतली होती. विद्यार्थ्यांना पाठिंबा देणाऱ्या बॉलीवूड कलाकारांमध्ये सोनाक्षीचा समावेश होता. सोनाक्षी सिन्हाच्या कामाबद्दल सांगायचं तर ती शेवटची ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘सिस्टम’ या लीगल ड्रामामध्ये दिसली होती. या चित्रपटात तिने वकिलाची भूमिका साकारली होती.