सोनाली बेंद्रेने कर्करोगाशी लढा देत पुन्हा दमदार कमबॅक केलं खरं, पण हा प्रवास तिच्यासाठी नक्कीच सोपा नव्हता. अभिनेत्रीने अनेकदा याबद्दल बोलताना तिचा अनुभव सांगितला आहे. मात्र आता तिने कर्करोगावर उपचार केल्यानंतर डोक्यावरचे केस नसताना विमानतळावर पापाराझींना सामोरं जाण्याचा निर्णय का घेतला यामागचं कारण सांगत तेव्हाचा अनुभव सांगितला आहे.
‘आरापार’ला दिलेल्या मुलाखतीत सोनाली बेंद्रेने कर्करोगामुळे डोक्यावरचे केस गेल्यानंतर जेव्हा ती पहिल्यांदा माध्यमांसमोर आली त्याआधीच तिच्या पतीने गोल्डी बहल यांनी तिला पापारांझींना सामोरं जायचं आहे का की, दुसऱ्या मार्गाने बाहेर जाऊया असं विचारलं होतं. मात्र सोनालीने लपवण्यात काही अर्थ नाही. जेवढं लपवणार तेवढं ते मागे मागे येणार म्हणून तिने त्याच अवस्थेत पापाराझींना सामोरं जाण्याचा निर्णय घेतला.
केस जायला लागले तेव्हा वाईट वाटलं – सोनाली
अभिनेत्री याबद्दल म्हणाली, “त्यावेळेला जेव्हा केस जायला लागले. तेव्ह अर्थात मला वाईट वाटलं. कारण माझी सगळी ओळखंच लूक्सवरुन होती. तेच माझ्या ब्रेड बटरचं साधन होतं. असा कुठला हेअर प्रोडक्ट नसेल ज्याची जाहिरात मी केली नसेल. इतके लांब केस होते. त्यामुळे ते केस जाणं एक धडा होता माझ्यासाठी. मला वाटतं की प्रत्येक अडचण तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येते. मी विगसुद्धा निवडून ठेवल्या होत्या, पण त्या खूप टोचायच्या. त्यामुळे मी म्हटलं की आधी मला जे आहे त्याचा स्वीकार करावा लागेल.”
डोक्यावर केस नसतानाही पापाराझींना सामोरं जाण्याचा निर्णय घेतला
सोनाली पुढे विमानतळावरील प्रसंगाबद्दल म्हणाली, “मला आठवतंय तेव्हा मी व्हीलचेअरवर होते. मी इथे नव्हते पण याबद्दल खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आम्हाला त्यावेळी फोन येत होते की बाहेर मीडिया आहे. मला गोल्डी म्हणाला की मला बाहेरुन फोन येत आहेत. तुला चालणार आहे का, की आपण थोडा वेळ थांबुया की दुसऱ्या मार्गाने जायचं. मला आठवतंय मी विग घालण्याचा प्रयत्न करत होते. सुटकेस वगैरे येई पर्यंत मी विचार करत होते की आता जर का मला जायचं आहे. मला मीडियाला नाही बघायचंय. पण जर त्यांना मला बघायचं आहे आणि माझा फोटो येणारच आहे तर मग मला त्यावर नियंत्रण हवंय. कारण जेवढं तुम्ही लपवणार तेवढं ते तुमच्यामागे येणार. फार तर काय बोलणार, केस नाहीये, चेहरा सुजला आहे बोलावं आता आहे ते आहे.”

दरम्यान, माध्यमांच्या वृत्तानुसार सोनाली बेंदेला २०१८मध्ये कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यानंतर तिने अमेरिकेत यावर उपचार घेतले. सोनालीच्या पतीने निर्माते गोल्डी बहल यांनी तिला या काळात खंबीर साथ दिली. त्यानंतर २०२१मध्ये ती कर्करोग मुक्त झाल्याचं वृत्त आहे.
