सोनाली बेंद्रे सध्या तिच्या ‘सोहळा’ या मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहे. जो १६ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले आहेत. याचदरम्यान तिने तिच्या आवडत्या पदार्थांबद्दलही सांगितलं.
सोनाली बेंद्र आजही तितकीच सुंदर आणि फिट आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात करत ती अनेकांसाठी आदर्श ठरली. त्यामुळे ती निरोगी राहण्यासाठी आरोग्याची काळजी कशी घेते, तिच्या आहारात काय असतं तसेच तिचा फिटनेस याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असतात. मात्र अनेकांना माहीत नसेल की सोनाली घरगुती जेवण खाणं पसंत करते. महत्त्वाचं म्हणजे तिला पारंपरिक मराठी पदार्थ आवडतात आणि तिच्या नवऱ्याच्या पंजाबी संस्कृतीमधीलही अनेक पदार्थ आवडीने खाते. असंही तिने मुलाखतींमधून सांगितलं आहे.
सोनालीला आवडते मुगाच्या डाळीची खिचडी
आता ‘अमुक तमुक’ला दिलेल्या मुलाखतीत तिला तिच्या आवडत्या पदार्थांबद्दल विचारल्यानंतर सोनाली म्हणाली, “मुगाच्या डाळीची खिचडी. आजही मी आजारी असेन, थकलेली असने, मला बरं वाटत नसेल तर मी मुगाच्या डाळीची खिचडी खाते. जेव्हा मी कुठे बाहेरगावी प्रवास करते तेव्हा मला हीच समस्या होते की मला खिचडी कुठे मिळत नाही. त्यामुळे जेव्हा मला एखादं भारतीय हॉटेल दिसतं तेव्हा मी त्यांना माझ्यासाठी खिचडी बनवायला सांगते आणि ते बनवतात.”
सोनाली पुढे म्हणाली, “खिचडी माझ्यासाठी कंफर्ट फूड आहे. विशेषकरुन त्यावर तूप घातलेलं असेल आणि लिंबाचं लोणचं जे त्याच्याबरोबर खूप महत्त्वाचं असतं. पण गोड लिंबाचं लोणचं. तिखटही चांगलं आहे, पण खिचडीबरोबर गोड लिंबाचं लोणचं आवडतं. पण जेव्हा मला बरं वाटत नसतं तेव्हा मला फिश करीसुद्धा (मास्याचं कालवण)खूप आवडते कारण त्यांने तोंडाला चव येते. विशेषकरुन आईने बनवलेलं बोंबीलचं कालवण. आम्ही सीकेपी आम्ही कालवण बोलतो.”
दरम्यान, अलीकडे सोनाली बेंद्रेने दिलेल्या मुलाखतींमधून तिच्या करिअरमधील अनेक गोष्टी, किस्से सांगितले.यावेळी तिने मराठी चित्रपटात काम करण्याचा अनुभव ते सुरुवातीला हिंदी चित्रपट फक्त पैशांची गरज असल्याने निवडले या सगळ्याबद्दल सांगितलं. सोनाली बेंद्रेने आजवर अनेक भूमिका साकारत तिच्या सहज सुंदर अभिनयाने आणि सौंदर्याने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे आजही तिची क्रेझ कायम आहे.
