सोनाली बेंद्रे अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी यशाच्या शिखरावर असताना लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अनेक कलाकार लग्न झाल्याची माहिती लपवून ठेवायचे. मात्र सोनालीने असं केलं नाही. याबद्दल तिने सांगितलं आहे. परंतु, सोनालीचे पती गोल्डी बहल अमराठी असल्याने आणि आर्थिकदृष्ट्या त्यावेळी स्थिरावलेले नव्हते यामुळे तिच्या आईने तिला लग्नापूर्वी सावध करत प्रश्ना विचारला होता असं तिने सांगितलं आहे.
‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने तिच्या आईने लग्नापूर्वी तिला एक प्रश्न विचारला होता याबद्दल सांगितलं. सोनालीला मुलाखतीत त्यावेळी काही कलाकार लग्न झालंय ही गोष्ट लपवून ठेवायचे, तुम्ही लोकप्रियतेच्या शिखरावर असताना लग्न केलं हा निर्णय कसा घेतला? याबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “मला असं वाटतं त्यावेळी जे सुरू होतं त्याच्या विरुद्ध मी बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. ठरवून मला वेगळं करायचं आहे असं काही डोक्यात नव्हतं. पण स्वत:शी प्रमाणिक होते. हम साथ साथ है झाल्यानंतर मी एक टीव्ही शो केला त्यावेळी टेलीव्हिजन कोणी करत नव्हतं. पण मला तो शो आवडलेला. त्यावेळी मी गोल्डीला डेट करत होते. तो मला म्हणायचा की सोनाली टेलीव्हिजन खूप मोठं होणार आहे पुढे. त्यामुळे मी पुढे याचा खूप फायदा होईल याचा विचार करुन केला. मला मजा आली.”
सोनालीने ‘अशी’ केलेली आईची मनधरणी
लग्नाबद्दल सोनाली पुढे म्हणाली, “जेव्हा मी गोल्डीला डेट करत होते. तेव्हा सगळ्यांना माहीत होतं. माझ्या सहकलाकारांना माहीत होतं, माझ्या जवळच्या सगळ्यांना माहीत होतं. मी कधीच ते लपवलं नाही.” यानंतर घरी काही चर्चा झाली का की पंजाबी आहे वगैरे असं विचारल्यानंतर त्यावर सोनाली म्हणाली, “आईने मला एक प्रश्न हा विचारला होता की त्याने अजून काही सुरूही केलेलं नाही, सेटर नाहीये, तर तू हा निर्णय का घेत आहे. त्यावेळी मी आईला सांगितलं की आई तो माझा आदर करतो. त्यावेळेला मला जे हवं असेल ते मिळत होतं अशी परिस्थिती होती. फुलं, भेटवस्तू वगैरे पाठवायचे मला. मी म्हटलं आई माझ्या दिसण्यावरुन मला पसंत करणारे अनेक असतील पण मी माणूस म्हणून कशी आहे तो आदर जो आहे तो मला गोल्डी देतो. त्याने मला कधी तू का चालली आहेस हा प्रश्न विचारला नाही. तर का जात नाहीये, तू जायला हवं, तू ते कपडे घालायला हवे असं म्हणायचा. तो नेहमी माझ्यासाठी आनंदी असायचा. मला मागे रोखून धरण्यापेक्षा त्याने माझं यश साजरं केलं, मला आनंदी ठेवलं. त्यामुळे तो स्थिरावलेला नाहीये हा प्रश्न तिथेच सुटला.”
पुढे गोल्डी बहल पंजाबी आहेत याबद्दल ती म्हणाली, “तो आपल्यातला नाहीये हा प्रश्न निर्माण झाला नाही. कारण आम्ही खूप चांगले मित्र होतो. त्याच्या बहिणी घरी यायच्या वगैरे. तो आई-बाबांना आवडायचा. सगळे ग्रीन फ्लॅग त्याच्यामध्ये होते. त्यामुळे आईचा फक्त एकच प्रश्न की तो स्थिरावलेला नाही. तीन बहिणी आहेत. त्याचे वडील नव्हते. त्यामुळे तुला समजतंय की तू काय जबाबदारी घेते आहेस. असं तिने विचारलं. मी तिला त्यावर म्हटलं होतं आज जे स्थिरावलेले दिसतायत ते कदाचित उद्या नसतील आणि दुसरं म्हणजे हे जे स्थिरावलेले पुरुष असतात ना त्यातले बरेच लोक त्यांच्या बायका असतानाही अभिनेत्रींना फुलं वगैरे पाठवतात. त्यापेक्षा हेच चांगलं आहे. मला खोटं काही नको.
लग्न झाल्यानंतर कामावर झालेल्या परिणामाबद्दल सोनाली म्हणाली, “माझा मुलगा झाला तेव्हा मी ब्रेक घेतला. विशेष म्हणजे लग्नानंतर मी जास्त हिट चित्रपट दिले. मी ब्रेक घेतला माझा मुलगा झाल्यानंतर कारण मला ते हवं होतं.”
