Sonali Bendre shared her struggle Story : सोनाली बेंद्रे बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ९०च्या काळात अभिनेत्रीने अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं. पण, सोनालीचं आयुष्य हे खडतर आव्हानांनी भरलेलं राहिलं आहे. तिला स्टारडम, काम मिळवण्यासाठीची धडपड, कर्करोग या गोष्टींना सामोरं जावं लागलं. अशातच आता अभिनेत्रीने या सगळ्याबद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सोनाली बेंद्रने एका मुलाखतीत ‘सरफरोश’ या चित्रपटाबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्री Variety Indiaला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “माझे चित्रपट फारसे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी मानले जात नव्हते. पण सरफरोश प्रदर्शित झाला तेव्हा अनेकांनी त्याला डॉक्युमेंटरीसारखा चित्रपट म्हणत नाकारलं होतं”.
चित्रपट हिट ठरुनही नामांकन मिळालं नाही – सोनाली
सोनालीने पुढे सांगितलं की ‘सरफरोश’ यशस्वी झाल्यानंतरही तिला अपेक्षित लोकप्रियता मिळाली नाही. ती म्हणाली, “चित्रपट हिट झाल्यावर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होतं. मला आठवतं, त्या वेळी आलेल्या रिव्ह्यूमध्ये मला चित्रपटातील कॉमिक रिलिफ म्हटलं गेलं. म्हणजे मी मुख्य अभिनेत्री नव्हतेच. मला वाटलं होतं की आता तरी माझा चित्रपट हिट ठरला आहे आणि कदाचित मला पुरस्कारांसाठी नामांकन मिळेल. पण मला सांगण्यात आलं की हा तुझा चित्रपट नव्हता, तू फक्त हलकं-फुलकं पात्र साकारलं होतं. त्यामुळे मला त्या चित्रपटासाठी कोणतंही नामांकन मिळालंच नाही.”
सोनालीने पुढे ती नेहमी प्रसिद्धीसाठी आणि स्वत:ला अजून पात्र बनवण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं म्हटलं. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी सांगताना तिने सांगितलं की ती योगायोगानेच चित्रपटांमध्ये आली. कॉलेजमधील एका फॅशन शोमध्ये सहभागी झाल्यानंतर तिला ही संधी मिळाली. त्या वेळी एका स्पर्धक मुलीला दुखापत झाल्यामुळे सोनालीला त्या शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती.
सोनाली म्हणाली, “तेव्हापासून मी या क्षेत्राकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागले. हे क्षेत्र नेमकं काय आहे? इथे इतके पैसे कसे मिळतात? इतके पैसे मिळू शकतात, याची मला आधी कल्पनाच नव्हती”. मॉडेलिंगची कामं करत करतच तिचा इंडस्ट्रीतील प्रवास सुरू झाला, असंही तिने सांगितलं.
सोनालीने पुढे एका सामान्य मराठी कुटुंबातून असून अभिनय क्षेत्रात काम करण्याचा तिने कधी विचारही केला नसल्याचं म्हटलं आहे. ती म्हणाली, “आमच्या घरात इंजिनिअर, डॉक्टर, आयएएस अधिकारी असे लोक होते. चित्रपट पाहणं खूप कमी होतं आणि फिल्म मॅगझिन्स तर आमच्या घरी कधीच येत नव्हती.”
