Sonali Bendre Talks About Her Mother In Law : सोनाली बेंद्रे बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सोनालीने २००२ साली लग्न केलं; पण नंतर मुलाच्या जन्मानंतर तिने काही काळ अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला.

मुलाच्या जन्मानंतर कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी तिने ब्रेक घेतला होता. अशातच आता तिने भारती सिंहशी संवाद साधताना याबद्दल माहिती दिली आहे. यावेळी भारती सिंहबरोबर तिचा नवरा हर्ष लिंबाचियासुद्धा होता. सोनालीने संवादादरम्यान तिचे खासगी आयुष्य, तिला झालेला कर्करोग याबद्दल सांगितले आहे. यावेळी तिने तिला तिच्या सासूने दिलेल्या सल्ल्याबद्दल सांगितले.

सोनाली बेंद्रेची सासुबाईंबद्दल प्रतिक्रिया

सोनालीने यावेळी तिच्या सासुबाईंनी तिला स्वयंपाकघरात न जाण्याचा सल्ला दिला होता. त्याबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली, “माझ्या सासूनं मला सांगितलेली चांगली गोष्ट म्हणजे त्या म्हणाल्या होत्या की, तुझ्या आई-वडिलांनी तुला इतकं शिकवलं आहे. मग तुला हे सगळं करण्याची काहीही गरज नाही. जर तुला आवड असेल, तर वेगळी गोष्ट आहे. पण, तुला या सगळ्याची काहीही काळजी करण्याची गरज नाही.”

Award Banner

सोनाली याबद्दल पुढे म्हणाली, “मला चांगलंच आठवतंय… माझ्या सासूबाई नेहमी सांगायच्या की, गोल्डीचे बाबा नेहमी म्हणायचे, जेव्हा मी घरी आलेलो असेन तेव्हा माझ्या बायकोला मला स्वयंपाकघरात काम करताना पाहायचं नाहीये. मला तुला तिथे बघायचं नाहीये.”

सोनालीचे बोलणे ऐकल्यानंतर भारती सिंहने सांगितले की, ती जेव्हा थकलेली असते तेव्हासुद्धा तिचा नवरा हर्ष तिला जेवण बनवायला सांगतो. त्यावर हर्ष त्याची बाजू मांडत म्हणाला, “हे सगळं फक्त पदार्थांमधील चवीसाठी. मी तुला भाज्या चिरायला वगैरे सांगत नाहीये. पण, मसाले टाकून भाजी करायला, सगळं तयार असताना फक्त १० मिनिटं जातात. ती खूप चविष्ट जेवण बनवते. त्यामुळे मी दुसरं काय करायला हवं”.

सोनाली हर्षचं बोलणं ऐकून म्हणाली, “मला खात्री आहे की. तू उत्तम जेवण बनवत असशील; पण तरीसुद्धा का तेही ती थकलेली असताना तिनं जेवण का बनवायला हवं आणि फक्त चवीसाठी असं सांगणं कितपत योग्य आहे.”