Sonali Kulkarni mother sold chutneys and made tiffins : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या कौटुंबिक संघर्षावर भाष्य करत आईच्या आर्थिक कष्टाची आठवण सांगितली. घर चालवण्यासाठी आईने चटण्या विकण्यापासून डबे बनवण्यापर्यंत कष्ट घेतले. तसेच इन्कम टॅक्सची नोटीस आल्यावर दंडाचा चेक लिहिताना रडल्याचं सोनालीने सांगितलं. पैशांच्या व्यवस्थापनावर आणि पती नचिकेतबरोबरच्या फायनान्शिअल प्लॅनिंगवर ती मोकळेपणाने व्यक्त झाली.

आईने चटण्या विकल्या, डबे बनवले – सोनाली कुलकर्णी

कौुटंबिक पार्श्वभूमीबद्दल बोलताना सोनाली म्हणाली, “मी अशा अत्यंत साध्या कुटुंबातून आले आहे. त्यामुळे कधी कर भरावा लागेल इतके पैसे आमच्याकडे कधीच नव्हते. घर चालवण्यासाठी माझ्या आईने चटण्या विकल्या आणि लोकांसाठी डबे बनवले. आमच्या घरीच लहान मुलांसाठी एक डे केअर सेंटर चालवले जायचे आणि मी तिथली चीफ असिस्टंट होते.”

इन्कम टॅक्सच्या नोटिशीमुळे समजलं पैशांचं महत्त्व- सोनाली कुलकर्णी

एकदा सोनाली कुलकर्णीला एक अनपेक्षित इन्कम टॅक्स नोटीस आली. त्यामुळे तिला पैशांचे आणि आर्थिक नियोजनाचे महत्त्व कसे समजले? याबाबत ती व्यक्त झाली. “एकदा मला इन्कम टॅक्सची नोटीस आली आणि मला दंड भरावा लागला. तो चेक लिहिताना मी त्या दिवशी खूप रडले. मी एवढे पैसे कमवेन, असा कधीच विचार केला नव्हता. मला खूप वाईट वाटलं, पण त्याच दिवशी मला जाणवलं की, जर मी पैसे कमावू शकते, तर त्याची गुंतवणूक कुठे करावी हेही मला माहीत असायला हवं. इतकंच नाही तर मी टॅक्सबद्दलही समजून घेतलं पाहिजे. तेव्हापासून आता मी विचारपूर्वक गुंतवणूक करते. मी माझे पैसे नेहमी वेगळे ठेवते. मी आणि माझा पती नचिकेत आमचे पैसे एकत्र करत नाही.”

sonali-kulkarni-reveals-mother-sold-chutney-making-tiffin-boxes-facing-income-tax-notice_613f99
सोनाली कुलकर्णी (फोटो- इन्स्टाग्राम)

सोनाली कुलकर्णीला कोणत्या गोष्टीसाठी स्वतःचा अभिमान वाटतो?

सोनालीने यापूर्वीही ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या कुटुंबाबद्दल सांगितलं होतं. “माझं कुटुंब अतिशय साधं आहे. आजही त्यांना चित्रपटसृष्टीबद्दल किंवा आम्हाला ज्या आव्हानांचा सामना करावा लागतो, त्याबद्दल काहीही माहिती नाही. त्यांचं एवढंच म्हणणं असतं की पूर्ण एकाग्रतेने आणि निष्ठेने काम करावं, हीच त्यांची अपेक्षा असते. मला वाटतं अशा अपेक्षांमुळे आपले पाय जमिनीवर राहतात. पण मला वाटतं की प्रत्येक तरुण मुला-मुलीला, विशेषतः १७-१८ वर्षे वयाच्या मुलांना प्रोत्साहन देऊन योग्य दिशा दाखवली पाहिजे. त्यांना पैशांची बचत, मोठ्या दिग्दर्शकांबरोबर काम करणं आणि व्यवसाय या गोष्टींबद्दल माहीत असायला हवं. मला बरेचदा स्वतःचा खूप अभिमान वाटतो. मी खरोखरून शून्यापासून सुरुवात केली आणि आज मी जिथे आहे, तिथे पोहोचल्यामुळे मला स्वतःला खूप श्रीमंत असल्यासारखं वाटतं.”