Sonali Kulkarni Bharat Movie Salman Khan Mother Role: बॉलीवूड चित्रपटांमध्ये अभिनेत्यांपेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींना त्यांच्या आईच्या भूमिकांमध्ये कास्ट करणं नवीन नाही. २०१९ मधील सलमान खानच्या सुपरहिट ‘भारत’ चित्रपटात मराठमोळ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सलमानच्या आईची भूमिका साकारून सर्वांनाच चकित केले होते. विशेष म्हणजे, सोनाली प्रत्यक्ष आयुष्यात सलमान खानपेक्षा तब्बल ९ वर्षांनी लहान आहे. सुरुवातीला ही भूमिका स्वीकारण्यास नकार देणाऱ्या सोनालीने अखेर दिग्दर्शक अली अब्बास जफर आणि कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्या ऑफरला होकार का दिला? याचा एक रंजक खुलासा केला आहे.
‘भारत’ची ऑफर आल्यावर सोनाली ही भूमिका करण्यास फारशी उत्सुक नव्हतीच. तिने या भूमिकेसाठी इतर अभिनेत्रींची नावं सुचवली होती. तसेच त्या या भूमिकेसाठी तिच्यापेक्षा कशा योग्य निवड ठरतील, हेही पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. पण शेवटी सलमान खानबरोबर काम करता यावं, यासाठी सोनाली कुलकर्णीने ही भूमिका स्वीकारली होती.
तुम्ही ही भूमिका मला का ऑफर करताय? सोनाली कुलकर्णी
‘गलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सोनाली म्हणाली, “जेव्हा मला ‘भारत’ चित्रपटाची ऑफर मिळाली, तेव्हा मला वाटलं की ही भूमिका मला शोभत नाही. त्यामुळे मी दिग्दर्शक अली आणि कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरा यांना या भूमिकेसाठी योग्य वाटणाऱ्या इतर अभिनेत्रींची एक मोठी यादीच दिली आणि त्यांना विचारलं, ‘तुम्ही ही भूमिका मला का ऑफर करताय?'”
भूमिकेबद्दल मनात न्यूनगंड नसतो- सोनाली कुलकर्णी
पुढे ती म्हणाली, “कोणतीही भूमिका साकारताना माझ्या मनात कसलाही न्यूनगंड नसतो. मी कोणत्याही प्रकारचे पात्र साकारण्यासाठी नेहमीच तयार असते. माझ्या पहिल्या ‘चेलुवी’ (१९९२) चित्रपटात मी झाडात रूपांतरित होणाऱ्या मुलीची भूमिका केली होती. ‘दायरा’ (१९९६) मध्ये मी मिशी असलेल्या मुलाचं पात्र साकारलं होतं. आईची भूमिका करायची आहे हे ऐकताच अनेक लोक घाबरतात. पण ती आई कोणाची तरी मैत्रीण, वहिनी किंवा पत्नीसुद्धा असू शकते, हे आपण विसरतो. ‘मिशन काश्मीर’ (२०००) चित्रपटातील संजय दत्तची पत्नी म्हणून लोक माझी आठवण काढतात, फक्त हृतिक रोशनची आई म्हणून नाही.”
सोनाली कुलकर्णीने भारतची ऑफर का स्वीकारली?
“तर अशा भूमिका साकारण्याची मला भीती वाटत नाही. पण भारतवेळी माझ्या मनात संकोच होता, कारण आपण त्या पात्रासारखे दिसायला तरी हवे. मग मी चित्रपटाची कथा ऐकली आणि मला जाणवलं की यात सलमान खानच्या बालपणीच्या फ्लॅशबॅकवर जास्त भर दिलाय, तसेच मी कधीच सलमान खानबरोबर काम केलं नव्हतं. मी एकदा माझ्या चित्रपटाच्या म्युझिक लाँचवेळी त्याला भेटले होते, इतकंच. त्यामुळे या चित्रपटात मला त्याच्याबरोबर काम करता येईल, हा विचार करून मी ऑफर स्वीकारली,” असं सोनाली कुलकर्णी म्हणाली.
सोनाली कुलकर्णीने ‘भारत’ची हिरोईन कतरिना कैफचं कौतुक केलं. तसेच सलमान व कतरिनाबरोबर काम करण्याचा अनुभवही सांगितला. “मी तिला डान्सचा अतिशय प्रामाणिकपणे सराव करताना पाहिलंय. तसेच या सर्वांबरोबर काम करण्याचा अनुभव खूप छान होता,” असं ती म्हणाली.
भारतचे बजेट १६५ कोटी रुपये होते आणि त्याने जगभरात ३२१ कोटी रुपयांची कमाई केली होती. या ब्लॉकबस्टर चित्रपटात सलमान, कतरिना, सोनाली कुलकर्णीबरोबरच दिशा पाटनी, सुनील ग्रोव्हर व जॅकी श्रॉफ हे कलाकारही होते.
