सोनाली कुलकर्णीने आपल्या तीन दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत विविध भाषांमधील अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यापैकी एक म्हणजे अली अब्बास जफर दिग्दर्शित २०१९ साली प्रदर्शित झालेला ‘भारत’ हा चित्रपट. या चित्रपटात सोनाली कुलकर्णीने सलमान खानच्या आईची जानकी देवी यांची भूमिका साकारली होती.
सोनाली कुलकर्णीने याआधीसुद्धा बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांत लोकप्रिय अभिनेत्यांसह काम केलं आहे. पण या चित्रपटात तिने तिच्याहूनही वयाने मोठ्या असलेल्या सलमान खानच्या आईची भूमिका साकारली आहे. आता अभिनेत्रीने यामागचं कारण सांगतिलं आहे. त्याचसह तिने या चित्रपटात काम करण्याचा अनुभवही सांगितला आहे.
सोनाली कुलकर्णीनी सलमान खानच्या आईची भूमिका का साकारली?
विशेष म्हणजे, ५१ वर्षांच्या असलेली सोनाली कुलकर्णी ६० वर्षीय सलमान खानपेक्षा तब्बल नऊ वर्षांनी लहान आहे. तरीही ‘भारत’मध्ये तिने सलमानच्या आईची भूमिका साकारली. पडद्यावर आई-मुलाची भूमिका साकारताना असलेल्या वयातील फरकावर सोनालीने आपला निर्णय योग्य असल्याचं सांगितलं आहे. “कास्टिंगच्या वेळी मी म्हटलं होतं, मी ही भूमिका साकारू शकत नाही”, असा खुलासा सोनालीने स्क्रीनशी संवाद साधताना सांगितलं आहे.
मात्र, सोनालीने सांगितलं की दिग्दर्शक अली अब्बास जफर आणि कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा हे तिच्या कास्टिंगबाबत खूप ठाम होते. चित्रपटातील फ्लॅशबॅक सीक्वेन्सना त्यांनी विशेष महत्त्व दिलं होतं. सोनाली म्हणाली, “त्या चित्रपटासाठी फ्लॅशबॅक खूप महत्त्वाचा होता. भारतला त्याचं नाव कसं मिळतं आणि तो वेगवेगळ्या परिस्थितींवर कशी प्रतिक्रिया देतो, हे त्यातूनच समोर येतं. कोणत्याही दिग्दर्शकाला किंवा कास्टिंग डायरेक्टरला एखाद्या भूमिकेसाठी चुकीच्या व्यक्तीची निवड करायला आवडणार नाही. ती त्यांचीही चूक ठरेल. त्यामुळे मी त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि ही भूमिका एक आव्हान म्हणून स्वीकारली.”
सलमान खान, कतरिना कैफबरोबर काम करण्याचा अनुभव
सोनाली कुलकर्णीने सांगितलं की, या भूमिकेसाठी तिला तयार करण्यासाठी दिग्दर्शक आणि कास्टिंग डायरेक्टरला खूप समजावून सांगावं लागलं होतं. मात्र, सलमान खानला भेटण्याची उत्सुकतादेखील तिच्या निर्णयामागचं एक कारण होती. सलमानबद्दल तिने बरंच काही ऐकलं होतं. सोनाली म्हणाली, “भारतच्या सेटवर आमच्यात खूप चांगली मैत्री झाली. लोकांशी चांगल्या पद्धतीने वागणं त्याच्याकडून शिकता येतं. तो कायमच खूप प्रेमाने आणि आपुलकीने वागायचा. शिवाय, त्याने मला त्याची सायकल चालवायला दिली आणि त्याने माझं मन जिंकलं”.
सोनालीने पुढे सांगितलं की, “सलमान खानची निर्मिती असलेल्या या चित्रपटासाठी मला खूप चांगलं मानधन मिळालं होतं.” तसेच, चित्रपटात तिचे जास्तीत जास्त सीन बालकलाकाराबरोबर होते, ज्याने तरुण भारतची भूमिका साकारली होती. तर सलमान खानने साकारलेल्या मोठ्या भारतबरोबर तिचे फारच कमी सीन होते. मात्र, ही भूमिका साकारल्याचा सोनालीला अजिबात पश्चात्ताप नाही. कारण या निमित्ताने तिला कतरिना कैफचा लाइव्ह डान्स पाहण्याची संधी मिळाली. असं तिने सांगितलं आहे.
सोनाली म्हणाली, “ती किती सुंदर नृत्य करते आणि किती सुंदर दिसते. आम्ही सेटवर खूप मजा केली. त्यामुळे माझी कोणतीही तक्रार नाही”. ‘भारत’मध्ये कतरिना कैफने कुमुद रैना ही भूमिका साकारली होती. ती भारतची प्रेयसी असते. चित्रपटातील लोकप्रिय ‘ऐथे आ’ या गाण्यावर कतरिनाने सलमान खानबरोबर नृत्य केलं. ‘भारत’मध्ये दिशा पाटाणी, सुनील ग्रोव्हर, तब्बू, जॅकी श्रॉफ आणि नोरा फतेही यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये होते. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ३२५ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती.
