अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने फरहान अख्तरच्या २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटात सैफ अली खानची प्रेयसी पूजाची भूमिका साकारली होती. त्यावेळी सोनालीने मोजक्याच हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र त्यातील तिच्या कामाचं आजही अनेक जण कौतुक करतात. आज या लोकप्रिय चित्रपटाला प्रदर्शित होऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

मराठी सिनेमांमधील दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोनालीची या चित्रपटासाठी फरहानची बहीण आणि चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टर झोया अख्तरने निवड केली होती. स्क्रीनशी संवाद साधतना सोनाली कुलकर्णी याबद्दल म्हणाली, “माझी सर्वात आधी झोया अख्तरशी भेट झाली. तिने माझा कुठलातरी फोटो पाहिला होता. तो फोटो दाखवणाऱ्या व्यक्तीशी ती सतत वाद घालत होती. ती म्हणत होती, ही सोनाली नाहीये. मी तिला आर्टहाऊस सिनेमात पाहिलं आहे आणि ती अशी अजिबात दिसत नाही. तो एक नेहमीसारखाच फोटोशूटचा फोटो होता. त्यानंतर झोयाने माझ्याशी संपर्क साधला आणि मला ऑडिशनसाठी बोलावलं.”

सोनालीने सांगितला ‘दिल चाहता है’चा अनुभव

सोनाली पुढे म्हणाली, “ऑडिशनच्या वेळी आम्ही खूप हसलो. झोया मला संवादासाठी क्यू देत होती आणि आम्ही त्यात उत्स्फूर्तपणे काही बदलही करत होतो. मला तो संपूर्ण माहोल आणि वातावरण खूप आवडलं”. सोनाली कुलकर्णीने सुरुवातीला ‘दिल चाहता है’च्या सेटवर आपण इतरांमध्ये सहज मिसळू शकू की नाही, अशी भीती वाटत होती. कारण ती पुण्यातील एका सामान्य मराठी कुटुंबातून होती. १९९०च्या दशकाच्या उत्तरार्धात पुण्याची ओळखही जवळपास एका छोट्या शहरासारखी होती. असं सांगितलं.

सोनाली म्हणाली, “मला फॅशन किंवा लक्झरीबद्दल फारशी माहिती नव्हती. पण झोया हीच ती व्यक्ती होती, जिने मला दिल चाहता है पर्यंत पोहोचवलं. ती एखाद्या अतिशय फॅशनेबल किंवा श्रीमंत व्यक्तीसारखी अजिबात वाटत नाही. ती खूप उत्साही आणि जमिनीवर पाय असलेली व्यक्ती आहे. तिला सिनेमा आणि अभिनयाची खूप आवड आहे. तिचा हा गुण आजही मला खूप आवडतो.” आता झोया अख्तर स्वतः एक यशस्वी दिग्दर्शिका बनली असल्याने तिच्याबरोबर पुन्हा काम करण्याची इच्छा सोनालीने व्यक्त केली आहे. झोयाबरोबर काम करण्याचं स्वप्न ती सध्या पाहत असून, ते प्रत्यक्षात यावं अशी तिची मनापासून इच्छा आहे.

सोनालीने पुढे प्रीती झिंटाबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. ती म्हणाली, “मिशन कश्मीरनंतर पुन्हा एकदा प्रीतीबरोबर काम करताना मला खूप आनंद झाला होता. आम्ही दोघीही एकमेकींचं मनापासून कौतुक करायचो आणि एकमेकींच्या यशाचा आनंद साजरा करायचो.” ‘दिल चाहता है’च्या प्रदर्शनाच्या एक वर्षाआधी, म्हणजेच २००० साली सोनालीने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘मिशन कश्मीर’ या अॅक्शन थ्रिलरमध्ये तिने हृतिक रोशनच्या आईची नीलिमा खानची भूमिका साकारली होती. या चित्रपटात प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत होती. यानंतर ‘दिल चाहता है’मध्ये सोनालीने पूजाची भूमिका साकारली, तर प्रीती झिंटाने आमिर खानची प्रेयसी शालिनीची भूमिका साकारली होती.