Sonam Kapoor second baby boy Name and Meaning: बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांना २९ मार्च २०२६ ला मुलगा झाला. अभिनेत्री ४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सोनमने ही गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. त्यांना पहिलासुद्धा मुलगा आहे, त्याचे नाव वायू असे आहे.
आता सोनमने दुसऱ्या मुलाचे काय नाव ठेवले आहे, याचा खुलासा केला आहे. तसेच, नावाचा अर्थही सांगितला आहे. याबरोबरच, सोनमने पती आनंद आहुजा आणि दोन्ही मुलांबरोबरचे खास फोटोसुद्धा शेअर केले आहे.
सोनम कपूरने ठेवलं दुसऱ्या मुलाचं खास नाव
सोनमने फोटो शेअर करत लिहिले, “एकादशीच्या शुभ दिवशी आमच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. दैवी शक्तीच्या पवित्र स्पर्शाने पुन्हा एकदा आमचे आयुष्य उजळून निघाले आहे. भगवान विष्णूंच्या कृपेच्या छायेखाली जन्मलेला आमचा दुसरा मुलगा आम्हाला एक दैवी संकेत, दैवी भेट वाटतो. त्याचे त्याच्या भावाबरोबरचे नाते पवित्र व अर्थपूर्ण वाटते. तो आमच्यासाठी देवाचा आशीर्वाद आहे, ज्याचा आम्ही सन्मान करतो.
पुढे तिने मुलाच्या नावाचा खुलासा करत लिहिले, “रुद्रलोक कपूर आहुजाचे आम्ही प्रेम आणि कृतज्ञतेसह स्वागत करतो.”
सोनमने रुद्रलोकचा अर्थही लिहिला. तिने लिहिले, “वेदांमध्ये रुद्रचा अर्थ गर्जना करणारा आहे. म्हणजेच शक्ती, धैर्य आणि नव्या सुरुवातीचे प्रतीक. सर्व शक्तींमध्ये श्रेष्ठ अशी दैवी ऊर्जा आहे. रुद्राचा वायूशी अतूट संबंध मानला जातो. आमच्या पहिल्या मुलाचे नाव वायु आहे. ज्याचा अर्थ जीवनाचा श्वास आणि ऊर्जा दर्शवतो. हे नाव विष्णूचे आहे. जो जीवनाचा पालनकर्ता आहे. आता रुद्रच्या आगमनाने आमचे कुटुंब आणखी पूर्ण झाले आहे.त्याच्या नावाप्रमाणेच, रुद्र धाडसी, प्रेमळ, सजग समजूतदार आणि प्रकाश देणारा व्यक्ती बनो, हीच आमची प्रार्थना.”
पुढे तिने चाहत्यांना उद्देशून लिहिले, “आपल्या प्रेम आणि आशीर्वादांसाठी मनापासून धन्यवाद. सोनम, आनंद, वायु आणि रुद्र.”
अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी अभिनंदन असे लिहिले आहे, अनेकांनी आशीर्वाद दिले आहेत, तर बऱ्याचजणांनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.
अभिनेत्रीने दोन्ही मुलांसह फोटो शेअर केले असले तरी त्यांचे चेहरे मात्र दाखवले नाही. त्यामुळे सोनमच्या मुलांना पाहण्याची उत्सुकता चाहत्यांच्या मनात कायम आहे.
