बॉलीवूडमध्ये अनेक स्टार किड्सचे पदार्पण खूप गाजले, पण नंतर मात्र सर्वांनाच यश मिळाले असं नाही. अभिनेत्री सोनम कपूर त्यापैकीच एक ठरली. अनिल कपूर यांची मुलगी असल्यामुळे तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठ्या बॅनरखाली पदार्पणाची संधी मिळाली, पण तिच्या १६ वर्षांच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. जवळपास २० चित्रपटांपैकी तिचे निम्मे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. सोनम कपूरच्या करिअरवर एक नजर टाकुयात.
सोनम कपूरच्या करिअरची सुरुवात
अभिनेत्री म्हणून काम करण्यापूर्वी सोनम कपूरने प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर भन्साळी यांनीच तिला आणि रणबीर कपूरला २००७ मध्ये ‘सावरिया’ चित्रपटातून लाँच केले. या चित्रपटाकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या, पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप झाला. पण सोनमचा पडद्यावरील वावर आणि तिच्या ग्लॅमर लूकने लोकांचे लक्ष वेधून घेतले.
सुरुवातीचा संघर्ष आणि नंतर अपयश
‘सावरिया’ नंतर सोनमने ‘दिल्ली-६’, ‘आय हेट लव्ह स्टोरीज’ आणि ‘आयशा’ या चित्रपटांमध्ये काम केले. यापैकी ‘आय हेट लव्ह स्टोरीज’ हा चित्रपट सरासरी चालला, तर उर्वरित दोन्ही चित्रपट फ्लॉप झाले. यानंतर २०११ आणि २०१२ मध्ये तिचे ‘थँक यू’, ‘मौसम’ आणि ‘प्लेयर्स’ हे तीन चित्रपट रिलीज झाले. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे आपटले.
‘रांझणा’ चित्रपटाने बदललं सोनमचं नशीब
२०१३ मध्ये ‘रांझणा’ चित्रपट रिलीज झाला आणि तो सोनम कपूरच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. धनुष आणि अभय देओल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातील सोनमच्या अभिनयाचं पूर्वीच्या तुलनेत खूप कौतुक झालं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आणि सोनमकडे एक परिपक्व अभिनेत्री म्हणून पाहिलं जाऊ लागलं. त्याच वर्षी ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातील तिच्या छोट्या पण प्रभावी भूमिकेनेही लक्ष वेधून घेतले. चित्रपटाच्या यशाचं श्रेय फरहान अख्तरला गेलं, पण सोनमलाही त्याचा फायदा झाला.
‘नीरजा’मधील दमदार अभिनय
२०१६ मध्ये रिलीज झालेला ‘नीरजा’ हा सोनम कपूरच्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपट मानला जातो. एअर होस्टेस नीरजा भानोत यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक या दोघांचंही भरभरून प्रेम मिळालं. सोनम कपूरला यासाठी ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ (स्पेशल मेन्शन) देखील मिळवून दिला.
सोनम कपूरच्या करिअरमधील एकमेव ब्लॉकबस्टर चित्रपट
सोनम कपूरच्या करिअरमधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर म्हणजे २०१८ मध्ये आलेला ‘संजू’ चित्रपट होय. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली आणि तो ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात सोनमची भूमिका छोटी होती, तरी हा तिच्या करिअरमधील एकमेव ब्लॉकबस्टर चित्रपट मानला जातो. याच वर्षी तिचा ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट हिट ठरला होता.
२०१९ नंतर सोनमचे फिल्मी करिअर मंदावले. ‘द जोया फॅक्टर’ सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. लग्न आणि त्यानंतर सोनम आई झाली, त्यामुळे ती मोठ्या पडद्यापासून दूर गेली. २०२३ मध्ये आलेल्या ‘ब्लाइंड’ या चित्रपटातून तिने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, पण हा चित्रपट फारसा चालला नाही.
अभिनेत्री म्हणून सोनम कपूरचं करिअर चढ-उतारांनी भरलेलं राहिलं. पण तिने फॅशनविश्वात मोठं नाव कमावलं. आंतरराष्ट्रीय रेड कार्पेटपासून ते ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’पर्यंत भारतीय सेलिब्रिटींच्या फॅशनला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात सोनमने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तिला बॉलीवूडची पहिली ‘फॅशनिस्टा’ म्हटलं जातं.
