Sonam Wangchuk Ghajini Statement Aamir Khan: राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘३ इडियट्स’ सिनेमा सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर आधारित नसल्याचं मत आमिर खाननं व्यक्त केलं होतं. सिनेमाचं शूटिंग सुरू असताना आमिरला वांगचुक यांच्याबद्दल कोणतीही माहिती नव्हती, तसेच त्यांची कोणतीही भेट झाली नसल्याचं आमिर म्हणाला होता. आता या वक्तव्यावर सोनम वांगचुक यांनी स्वतः प्रतिक्रिया देत आमिर खान गजनीसारखा विसरभोळा झाल्याचं म्हणत त्याला फटकारलं आहे.
प्रखर गुप्ताच्या पॉडकास्टमध्ये सोनम वांगचुक यांनी आमिरच्या वक्तव्यावर भाष्य केलं. सोनम वांगचुक म्हणाले, “ते म्हणत आहेत की, आमची कधीच भेट झालेली नाही. पण त्यांचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामध्ये ते ‘गजनी’च्या लूकमध्ये माझं एक भाषण ऐकत असल्याचं दिसून येतंय. कदाचित ते त्यावेळी ‘गजनी’च्या भूमिकेमध्येच होते.”
त्यांचा शॉर्ट-टर्म मेमरी लॉस झाला असेल – सोनम वांगचुक
पुढे सोनम वांगचुक म्हणाले, “ते गजनीच्या आऊटफिटमध्येच आले होते आणि त्यामुळे त्यांचा शॉर्ट-टर्म मेमरी लॉस झाला असेल. १५ मिनिटांनंतर ते सगळं काही विसरले असतील. अर्थात, यामुळे काहीच आश्चर्य वाटत नाहीये; पण आमची भेट झाली होती आणि अनेक गोष्टींवर सविस्तर चर्चा केली होती.”
3 Idiots सिनेमात माझ्यावरून घेतली प्रेरणा – सोनम वांगचुक
आमिरच्या वक्तव्याची आठवण करून देताना सोनम वांगचुक म्हणाले, “आम्ही ऐकलं आहे की, आमिर त्यांच्या व्यक्तिरेखेत खूप खोलवर शिरतात. त्यामुळे कदाचित ते ‘गजनी’च्या भूमिकेत इतके रमले असतील की, ज्या पुरस्कार सोहळ्यात मी पुरस्कार स्वीकारत होतो, तिथे ते आले होते हेही ते विसरले असतील. मी असं म्हणणार नाही की, त्यांनी माझ्यावर आधारित चित्रपट बनवला किंवा माझं चरित्र त्यात घेतलं; पण त्यातून प्रेरणा घेतली, असं म्हणता येईल. त्यांच्या स्क्रिप्टमध्ये काही गोष्टी जोडल्या असतील. कदाचित त्यांच्या लेखकांना किंवा दिग्दर्शकांना हे माहीत नसेल की, कोणाला भेटल्यानंतर किंवा कोणाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी कुठून तरी मिळालेली एखादी कल्पना त्यात जोडली आहे; पण मला काही फरक पडत नाही. जाऊ द्या.”
आमिर खान काय म्हणाला होता?
ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या एका संवादादरम्यान आमिर खानला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि त्यांच्या सुरू असलेल्या उपोषणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी आमिरनं ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाच्या निर्मितीवेळी त्याला सोनम वांगचुक यांच्याबद्दल काहीच माहिती नसल्याचं सांगितलं होतं. आमिर म्हणालेला, “हा एक गैरसमज आहे. मला सोनम वांगचुक यांच्याबद्दल माहिती नव्हती. कदाचित चतुरला तसं वाटत असेल. पण मला सांगायचं आहे की, लेखकांना, दिग्दर्शकांना किंवा मला, आम्हाला कोणालाच सोनम वांगचुक यांच्याबद्दल माहिती नव्हती. मात्र, सोनमजी जे काम करीत आहेत ते चांगलंच आहे. त्यासाठी त्यांना ‘थ्री इडियट्स’मधील भूमिकेवर आधारित असण्याची गरज नाही.”
