Sonam Wangchuk Salman Khan Its Done Bro Post Reaction: सोनम वांगचुक यांनी आमिर खान व सलमान खान यांनी विद्यार्थी आंदोलनाच्या वेळी केलेल्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. आमिर खानला ‘गजनी’सारखा विसरभोळेपणा आल्याचे म्हटल्यांतर आता सलमान खानच्या ‘इट्स डन ब्रो’ या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. सलमान खानची काहीतरी ‘मजबुरी’ असेल, असा टोला सोनम वांगचुक यांनी लगावला आहे.

प्रखर गुप्ताला दिलेल्या मुलाखतीत सोनम वांगचुक यांनी बॉलीवूडच्या कलाकारांना लक्ष्य केले. आंदोलनावेळी केलेल्या वक्तव्यांवर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सलमान खानने दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनामध्ये आधी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला, त्यानंतर २४ तासांत आंदोलन मागे घेण्याबाबत पोस्ट केली होती. ‘सोनम, आता बास झालं ब्रो’ असं सलमान खान म्हणाला होता. याबाबत मुलाखतीमध्ये विचारल्यानंतर सोनम वांगचुक म्हणाले, “प्रत्येकाचाच काही ना काही नाईलाज असतो, मला त्यात पडायचं नाही.”

सलमान खानचा नाइलाज – सोनम वांगचुक

पुढे ते म्हणाले, “तुम्हाला सगळ्या बाजूंनी विचार करावा लागतो. त्यानं निदान काहीतरी भूमिका घेतली, या गोष्टीचा मी आदर करतो. पण, त्याच्या नाइलाजाबद्दल मी काहीही बोलू शकत नाही.”

काय होती सलमान खानची पोस्ट?

२२ जुलै रोजी सोनम वांगचुक उपोषणाच्या शेवटच्या टप्प्यात असताना सलमान खानने सोशल मीडियावर त्यांना पाठिंबा दिला होता. विद्यार्थी असतानाचा स्वतःचा एक जुना फोटो शेअर करीत सलमानने राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच नीटच्या पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता.

सलमान खानने दिलेला विद्यार्थ्यांना पाठिंबा

सलमान खानने आधी विद्यार्थ्यांना समर्थन करणाऱ्या पोस्टमध्ये लिहिलं, “आंदोलन इतकं शांततापूर्ण होतं, त्यामुळे त्याला हिंसक वळण लागल्याचं पाहून मला खूप वाईट वाटलं. ज्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना याचा त्रास झाला, त्यांच्यासाठी माझ्या मनात खूप सहानुभूती आहे. पेपरफुटी हा अत्यंत गंभीर विषय आहे. आपल्या देशातील मुलं चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र आली आहेत आणि त्यांच्या पालकांनीही त्यांना पाठिंबा दिला, हे पाहून मला आनंद झाला. त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं, त्यांच्या समर्पणाचं, प्रामाणिकपणाचं आणि मेहनत करून शिक्षण घेण्याच्या इच्छेचं मी मनापासून कौतुक करतो. मुद्दा विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेतील आहे. त्याला राजकीय रंग दिला जाऊ नये. याचं श्रेय केवळ आपल्या देशातील विद्यार्थ्यांना मिळायला हवं.”

सलमानने केली ‘इट्स डन ब्रो’ लिहिलेली पोस्ट

मात्र, या पोस्टनंतर अवघ्या २४ तासांत सलमानने आणखी एक पोस्ट करीत सोनम वांगचुक यांना उपोषण थांबवण्याचं आवाहन केलं आणि लिहिलं, “विद्यार्थ्यांचं हित सर्वांत महत्त्वाचं आहे. आता पंतप्रधानांनी ट्वीट करून नीट पेपरफुटीमधील दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. ते योग्य ते कारवाई करतील याची मला खात्री आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, कृपया आता तुमच्या घरी जा. “सोनम, बास झालं आता. ब्रो,. हा विषय आणखी ताणू नकोस. गरज पडल्यास (जी पडेल असे मला वाटत नाही) हा उत्साह नंतर कधीतरी दाखवता येईल. आता काहीतरी खाऊन घे. तुला हवं असेल, तर मी घरून जेवण पाठवून देईन.”