सोनी राजदान म्हटलं की काही जण आलिया भट्टची आई म्हणतात, तर काही दिग्दर्शक महेश भट्ट यांची दुसरी पत्नी म्हणतात. मात्र या सर्व भूमिका आयुष्यात येण्यापूर्वी सोनी एक उत्तम अभिनेत्री होत्या. त्यांनी ‘सारांश’सारखे चित्रपट तसेच ‘बुनियाद’सारख्या टीव्ही मालिकांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. महेश भट्ट यांच्याशी लग्न केल्यावर आयुष्य कसं बदललं, याबाबत सोनी राजदान व्यक्त झाल्या आहेत.
‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत सोनी म्हणाल्या, “मी लग्न केलं, त्याआधीपासूनच मी काम करत होते. त्यामुळे ते काम सुरूच राहिले, पण त्यानंतर मात्र काहीच काम मिळालं नाही. शून्य. लग्नानंतर एका रात्रीत सगळं बदललं. मला काम मिळणंच बंद झालं.” सोनी आणि महेश यांचं लग्न १९८६ मध्ये झालं होतं. तेव्हापर्यंत सोनी राजदान यांनी पुरेसं काम केलं होतं.
महेश भट्ट सोनी राजदान यांना काय म्हणाले होते?
अचानक काम मिळणं बंद झालं, त्याबद्दल सोनी यांनी पतीला विचारलं. त्यावर महेश भट्ट यांनी सोनीला सांगितलं की इंडस्ट्रीचे लोक त्यांना म्हणतात, “तुमच्या पत्नीला काम करण्याची काय गरज आहे? तिचं लग्न झालंय ना?” लग्नानंतर महिलांनी काम सोडून दिलं पाहिजे या विचारसरणीची सोनी यांना अजिबात सवय नव्हती. “ही गोष्ट माझ्यासाठी पूर्णपणे वेगळी होती. माझी विचारसरणी किंवा मानसिकता तशी नव्हती. पण त्या काळात बरेच लोक असाच विचार करायचे,” असं त्या म्हणाल्या.

पुरुषी मानसिकतेबद्दल सोनी राजदान म्हणाल्या…
त्याकाळी अभिनेत्री लग्न उशीरा करायच्या कारण लग्न केलं की करिअर संपलं, असं तेव्हा समजलं जायचं. “या कारणामुळेच अभिनेत्री लग्नाची घाई करायच्या नाहीत. पण मी प्रेमात होते, त्यामुळे मला लग्न करायचंच होतं,” असं त्या म्हणाल्या. त्यांनी चित्रपटसृष्टीतील पुरुषप्रधान दृष्टिकोनावरही भाष्य केलं. “ती पूर्णपणे पुरुषी मानसिकता होती. आकर्षक स्त्रीची व्याख्या वगैरे सगळं काही पुरुषांच्या दृष्टिकोनातून ठरायचं. मुळात स्त्रीने फक्त आकर्षकच का असलं पाहिजे? मला कळतंय की चित्रपटात लोक तुम्हाला अडीच तास पाहणार आहेत, पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही नात्यात राहू शकत नाही.”
सोनी राजदान यांच्यामते, कलाकाराला उत्तम अभिनय यायला हवा, त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा कामावर परिणाम होऊ नये. दरम्यान, सोनी राजदान यांचा ‘शक: ट्रस्ट नो वन’ सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. यात परिणीती चोप्रा व जेनिफर विंगेट आहेत.
