Sonu Nigam Help Lost Child : बॉलीवूडचा लोकप्रिय गायक सोनू निगमनं आजवर त्याच्या अनेक गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्याच्या आवाजातली गाणी आजही लोकांच्या ओठांवर असतात. सोनू निगमनं अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. त्याशिवाय तो अनेक ठिकाणी लाइव्ह परफॉर्मन्सही करत असतो. या लाइव्ह कार्यक्रमातील त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच त्याचा एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
सोनू निगमच्या हुबळीमधील कॉन्सर्टमध्ये ३० हजार प्रेक्षकांच्या गर्दीत श्री साई नावाचा एक लहान मुलगा हरवला होता. गर्दीत हरवल्यानं हा मुलगा घाबरलेला होता; मात्र सोनू निगमनं त्याच्या वागणुकीतून आणि गाण्यातून क्षणार्धात त्या मुलाची भीती घालवली. या मुलाचा व्हिडीओ सोनूने शेअर केला असून, व्हिडीओवर चाहत्यांकडून सोनूच्या संवेदनशीलतेचं कौतुक होत आहे.
सोनूने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, तो स्टेजवर त्या लहान मुलाचा हात धरून काळजी करू नकोस म्हणत त्याला समजावत आहे. पुढे तो मुलाला जवळ बोलावून गप्पा मारत त्याला शांत करतो. त्याच क्षणी सोनू या घटनेशी सुसंगत असं मजेशीर गाणं गायला सुरू करतो, जेणेकरून मुलाची भीती कमी व्हावी.
सोनू त्या मुलासाठी “श्री साई, इथे आहे… मम्मी-पप्पा, याला घेऊन जा… याचे मम्मी-पप्पा हरवले आहेत, कृपया लवकर या” असं मजेशीर गाणं गातो. त्यानंतर सोनू मुलाला त्याच्या आई-वडिलांबद्दल विचारतो. त्यावर तो लहान मुलगा मी आई-वडिलांबरोबर नव्हे, तर माझ्या काकाबरोबर आल्याचं सांगतो.
मग सोनू माइकद्वारे मस्करीत “याचे काका कुठे आहेत? काका-काकीबरोबर निघून गेले की काय? मोठ्या भावानं पुतण्याची जबाबदारी दिली होती आणि तुम्ही त्याच्याबरोबर असं करता आहात”, असं म्हणतो. मग त्या मुलाचे काका त्याला न्यायला येतात. तेव्हा सोनू स्वत: त्या मुलाला त्याच्या काकाकडे स्वाधीन करतो आणि लहान मुलांकडे लक्ष ठेवा, असंही सांगतो.
सोनू निगमने शेअर केलेला व्हिडीओ
सोनू निगमच्या नेटकऱ्यांकडून कौतुक
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहत्यांकडून सोनू निगमच्या संवेदनशीलतेचं भरभरून कौतुक होत आहे. एका नेटकऱ्यानं म्हटलंय, “आज सोशल मीडियावर पाहिलेला सगळ्यात सुंदर व्हिडीओ”, तर दुसऱ्यानं म्हटलंय, “सोनू निगमसरांसारखा कोणीच नाही”. तसंच “गाण्यांनीच नव्हे, तर स्वभावानंही मन जिंकणारा सोनू”, “सोनू निगमसर… एकच हृदय किती वेळा जिंकणार” अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
