Sonu Nigam Operation Theatre singing : आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय गायक सोनू निगमवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ शेअर करत त्याने याबद्दल माहिती दिली आहे. पण, ‘ऑपरेशन थिएटर’मधील या व्हिडीओने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. याचे कारण म्हणजे, शस्त्रक्रिया सुरू असताना सोनू निगम हा चक्क गाणं गाताना दिसत आहे.
बॉलीवूडचा एक काळ गाजवलेला आणि अजरामर अशी गाणी गायलेला सोनू निगम हा सध्या वैद्यकीय कारणांमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ‘पिंच्ड नर्व’ची समस्या निर्माण झाल्याचे सांगितले होते. यामुळे त्याच्यावर औषधोपचारासह फिजिओथेरपीसुद्धा केल्याचे सोनूने सांगितले होते. यानंतर आता त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली असून ती सुरू असताना सोनू निगमने ‘ऑपरेशन थिएटर’मधील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये डॉक्टर त्याच्यावर शस्त्रक्रिया करीत असताना सोनू निगम गाणं गाताना दिसत आहे.
सोनू निगमने ऑपरेशन थिएटरमध्ये गायलं ‘हे’ गाणं
सोनू निगमने रविवारी इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला. त्याने ‘ऑपरेशन टेबल’वर झोपलेला असताना, 1949 मधील ‘दुलारी’ सिनेमातील गाणं गायलं. मोहम्मद रफीचं प्रसिद्ध ‘सुहानी रात ढल चुकी’ हे गाणं त्याने ऑपरेशन थिएटरमध्ये गायलं आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांसाठी त्यानं हे गाणं गायल्याचं सांगितलं आहे. कॅप्शनमध्ये सोनूने लिहिलं, “माझी शस्त्रक्रिया सुरू असताना डॉक्टर आणि त्यांच्या प्रेमळ टीमसाठी हे गाणं गायलो. दुखत असतानाही गाणं गात राहिलो, संगीतामध्ये ही वेगळीच जादू आहे,” अशा आशयाचं कॅप्शन सोनू निगमने दिले आहे. पण, त्याच्यावर नेमकी कोणती सर्जरी झाली याची अधिकृत माहिती सोनूने दिलेली नाही.
श्रेया घोषालने केली कमेंट्स
सोशल मीडियावर सोनू निगमचा हा ‘ऑपरेशन थिएटर’मधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याच्या चाहत्यांनी आणि बॉलीवूडमधील कलाकार व गायकांनी त्याला लवकर बरं होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. तसेच चाहत्यांनी प्रकृतीबाबत काळजी व्यक्त केली आहे. शस्त्रक्रिया सुरू असताना आणि वेदना होत असतानाही गाणं गाणाऱ्या सोनू निगमचा हा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्याच्या या पोस्टवर लोकप्रिय गायिका श्रेया घोषालने लिहिलं, “तुम्ही लवकर बरे व्हा अशी मनापासून इच्छा आहे. अशा परिस्थितीतही तुमचं संगीतावरील प्रेम आणि गाण्याची जिद्द खरंच प्रेरणादायी आहे.” तसेच टोनी कक्कर आणि रणवीर अलाहाबादिया यांनी, ‘सर लवकरात लवकर बरे व्हा, माझ्याकडून खूप खूप प्रेम,’ अशा कमेंट्स केल्या आहेत. त्याचबरोबर मराठी अभिनेता अभिजीत केळकर व शर्मिष्ठा राऊत यांनी सोनू निगम यांना ‘लवकर बरं व्हा,’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
