प्रसिद्ध गायक आणि चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेला सोनू निगम पुन्हा एकदा एका मोठ्या आर्थिक व्यवहारामुळे चर्चेत आला आहे. ‘सीआरई मॅट्रिक्स’च्या रिपोर्टनुसार, सोनू निगमने कर्जत येथे आपल्या मालकीची १.९ हेक्टर जमीन चार वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये १.९५ कोटी रुपयांना विकली आहे. ७ एप्रिल २०२६ रोजी या जमिनींचे व्यवहार पूर्ण झाले असून, यासाठी ११.७० लाख रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे.

‘सीआरई मॅट्रिक्स’कडून मिळालेल्या कागदपत्रांनुसार, प्रसिद्ध गायक सोनू निगमने कर्जत येथील १.९ हेक्टरपेक्षा जास्त जमिनींचे तुकडे १.९५ कोटी रुपयांना विकले. ही विक्री चार वेगवेगळ्या व्यवहारांमार्फत विविध खरेदीदारांना करण्यात आली आहे. सोनू निगमने सर्वात मोठी जमीन, ०.७१८ हेक्टर ७५ लाख रुपयांमध्ये विकली. तर ०.४०५ हेक्टर आणि ०.६०७ हेक्टरच्या इतर दोन जमिनींची विक्री प्रत्येकी ५० लाख रुपयांमध्ये झाली. सर्वात लहान जमीन ०.२०८ हेक्टरची विक्री २० लाख रुपयांना करण्यात आली.

११.७० लाख मुद्रांक शुल्क

हे सर्व व्यवहार ७ एप्रिल २०२६ रोजी रजिस्टर करण्यात आले आहेत. या सौद्यांसाठी एकूण ११.७० लाख रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. पण सोनू निगमने अद्याप या व्यवहाराबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.

कर्जत हे शहर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असल्याने आणि तिथल्या निसर्गरम्य वातावरणामुळे रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी सेलिब्रिटींची पहिली पसंती ठरत आहे. सोनू निगमने याआधीही सांताक्रूझमध्ये मालमत्ता भाड्याने घेणे आणि मढ आयलंडवर वडिलांच्या नावे १० कोटींची इमारत खरेदी करणे, असे मोठे रिअल इस्टेट व्यवहार केले आहेत.

रायगड जिल्ह्यातील कर्जत हे शहर उत्तम कनेक्टिव्हिटी आणि निसर्गरम्य वातावरणामुळे जमीन गुंतवणुकीसाठी सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय ठरत आहे. हा भाग नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ आहे. त्यामुळे इकडे विकासकामे वाढत आहे. मुंबईतील गर्दी कमी करणं आणि नवीन औद्योगिक क्षेत्र विकसित करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र सरकार भूसंपादन धोरणं आणि पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीद्वारे या भागाचा विकास करत आहे, जेणेकरून जागतिक गुंतवणूकदार, उद्योग आणि नवीन टाउनशिपला आकर्षित करता येईल.

सोनू निगमची इतर गुंतवणूक

गायक सोनू निगमने गेल्या वर्षभरात अनेक रिअल इस्टेट व्यवहार केले आहेत. त्याने केवळ जमिनी विकल्याच नाहीत, तर मोठी गुंतवणूकही केली आहे. २०२५ मध्ये त्याने मुंबईतील सांताक्रूझ (पूर्व) भागात एक मालमत्ता पाच वर्षांसाठी भाड्याने घेतली. याचं एकूण भाडं १२.६१ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये त्याचे वडील अगम कुमार निगम यांनी मढ आयलंड येथे १,१९७ चौरस मीटरची एक इमारत १० कोटी रुपयांना खरेदी केली.

सोनू निगमची संपत्ती

सोनू निगमचा मुंबईत एक आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत साधारण २५ कोटी रुपये आहे. या बंगल्यात सर्व आधुनिक सुख-सोयी उपलब्ध आहेत. हा बंगला एका शांत परिसरात आहे. २०२६ पर्यंतच्या अंदाजानुसार, सोनू निगमची एकूण संपत्ती ३५० कोटी ते ४०० कोटी दरम्यान आहे. त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत पार्श्वगायन, लाईव्ह कॉन्सर्ट्स आणि शोज त्याचबरोबर जाहिराती व गंतुवणुकीचा समावेश आहे.