बॉलीवूडचा अभिनेता सोनू सूद अभिनयाव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. कोविडदरम्यान स्थलांतरीत मजुरांसाठी बसेसची व्यवस्था करून देण्यापासून ते अनेक सामाजिक कार्ये त्यानं केली होती. या मदतीच्या भावनेमुळे सोनू सूद प्रेक्षकांच्या नजरेत ‘हीरो’ बनला आहे. सोनू अनेक विषयांवर आपली मतं परखडपणे मांडत असतो. नुकत्याच व्हायरल झालेल्या डिलिव्हरी बॉयच्या व्हिडीओवरदेखील सोनूनं त्याची बाजू मांडत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नामांकित कंपनीच्या डिलिव्हरी बॉयचा शूज चोरतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच सोनू सूदने त्याचे समर्थन करीत त्याच्यावर कारवाई न करण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा… स्वप्नील जोशीने घेतलं रामलल्लाचं दर्शन; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “याची देही याची डोळा…”

सोनू सूदनं त्याच्या एक्स अकाउंटवर याबाबतची एक पोस्ट शेअर केली. “एखाद्याच्या घरी अन्न पोहोचवताना स्विगीच्या डिलिव्हरी बॉयनं शूज चोरले असतील, तर त्याच्यावर कोणतीही कारवाई करू नका. खरं तर त्याला नवीन शूज खरेदी करून द्या. त्याला कदाचित खरोखरच गरज असेल. दयाळूपणा दाखवा”, असं सोनूनं यात नमूद केलं आहे.

सोनू सूदच्या या पोस्टला १.६ मिलियन व्ह्युज आले आहेत. सोनूची ही पोस्टदेखील व्हायरल होत आहे. बहुतेक लोकांना सोनूचं हे मत पटलं नाही. त्यावरून अनेक वाद-विवादही नेटकऱ्यांनी केले.

हेही वाचा… ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला रणवीर सिंहबरोबर करायचंय काम; म्हणाली, “भूमिका कशी…”

“कोणतीही कारवाई करू नका हे सांगणं त्यातल्या त्यात ठीक आहे; पण निरर्थक युक्तिवाद करून त्याचं समर्थन करू नका. गरिबी किंवा गरज हे चोरीचं समर्थन होऊ शकत नाही. या डिलिव्हरी बॉयपेक्षाही लाखो लोक गरीब आहेत; जे कष्ट करून आपला उदरनिर्वाह करतात. ते चोरी करीत नाहीत. चोरीचं समर्थन करणं हा त्यांच्या धडपडीचा अपमान आहे”, असं एका एक्स युजरनं लिहिलं.

“जर सोनसाखळी चोरानं तुमची सोन्याची चेन चोरली, तर त्याच्यावर कारवाई करू नका. खरं तर, त्याला सोन्याची नवीन चेन खरेदी करून द्या. त्याला कदाचित खरोखरच गरज त्याची गरज असेल. दयाळू व्हा”, असं दुसऱ्या युजरनं उपहासानं लिहिलंय.

हेही वाचा… “ती बिलं भरायची”, अनिल कपूर यांना कठीण काळात पत्नी सुनीताने केलेली मदत; म्हणाले…

“एखाद्याला मदतीची नितांत गरज असल्याशिवाय अप्रामाणिकपणाला प्रोत्साहन दिलं जाऊ नये”, असं तिसऱ्यानं लिहिलं. ” आणि जर तो नेहमीच अशी चोरी करीत असेल तर?” असं चौथ्यानं विचारलं.

दरम्यान, सोनू सूदच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सोनू सूद दिग्दर्शित फतेह या आगामी चित्रपटात सोनू प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि विजय राज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonu sood defend swiggy delivery boy for stealing shoes shared x post dvr