Sonu Sood Nepal Flood Relief Help: संकटकाळी सिनेविश्वातून मदतीचा एक हात कायम समोर असतो, तो म्हणजे अभिनेता सोनू सूद. भारतामध्ये कोणतीही आपत्ती येऊ दे किंवा सर्वसामान्यांना अडचणी येवोत, सोनू सूद कायम मदतीला हजर असतो. करोनापासून सुरू झालेला त्याचा हा समाजसेवेचा प्रवास आजही सुरू आहे. फक्त भारतातीलच नाही तर शेजारील नेपाळमधील लोकांसाठीही सोनू सूद धावून गेला आहे.
बॉलीवूड अभिनेता सोनू सूद नेपाळमध्ये दाखल झाला असून त्याने पूरग्रस्तांना मदत केली आहे. नेपाळमधील लोकांसाठी सोनू सूद काठमांडूला गेला असून त्याने जीवनावश्यक काही गोष्टी आणि अन्नपदार्थांचे वाटप केले. या पुरामध्ये नेपाळचे प्रचंड नुकसान झाले असून यातून वाचलेल्या लोकांना सोनू सूदने आधार दिला आहे.
काय म्हणाला सोनू सूद?
एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये नेपाळमधील परिस्थिती आणि केलेली मदत याबद्दल सोनू सूदने माहिती दिली. तो म्हणाला, “नेपाळमधील पूरग्रस्तांना भेटण्यासाठी मी आलो होतो. भारतातून काही गोष्टी आणल्या होत्या, त्या ज्या लोकांना गरज होती त्यांच्यामध्ये वाटप केले. या भीषण महापुरामुळे उद्ध्वत झालेली आयुष्य पुन्हा नव्याने उभारण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत.”
सोनू सूदने नेपाळमधील लोकांना केली ‘ही’ मदत
पुढे तो म्हणाला, “या परिस्थितीमध्ये अडकलेल्या लोकांना मदत करणे ही तर आपली जबाबदारी आहे. आम्ही अन्नपदार्थ आणि ब्लॅकेट्स यांचे वाटप केले. पूरग्रस्तांना आणखी कशाची गरज आहे याबद्दल त्यांना विचारून भारतातून मदत पाठवणार आहोत. भारतातून नेपाळमध्ये गोष्टी आणण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. पण, आम्ही येणाऱ्या काही दिवसांमध्ये आवश्यक ती सर्व मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. पुढचे काही महिने ही मदत आम्ही करत राहणार आहोत, ज्यामुळे पूरग्रस्तांचे आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत सुरू होऊ शकेल.”
#WATCH | Bollywood actor Sonu Sood arrives in Kathmandu to distribute relief to Nepali flood victims
He says, “We are here to meet flood victims and to distribute relief material to them. We will try to build their lives again. We have brought a lot of blankets and food… pic.twitter.com/6rONSZfxjD— ANI (@ANI) September 1, 2026
पुढे सोनू सूदने सर्वांना नेपाळमधील लोकांना मदत करण्याचे आवाहन केले. तो म्हणाला, “पूरग्रस्त लोकांना मदत करणे ही तर आपली जबाबदारी आहे. ही सर्व लोकं आधीच खूप मोठ्या संकटातून वाचली आहेत. या सर्व लोकांची घरं आणि आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत, त्यामुळे सध्या या सर्वांना मदत करण्याची आणि त्यांच्याबरोबर राहण्याची गरज आहे. पुन्हा एकदा पूरग्रस्तांची घरे बांधण्याची गरज आहे.”
नेपाळमध्ये किती भारतीय बेपत्ता?
नेपाळमध्ये भीषण महापूर आला असून यामुळे सर्वत्र हाहाःकार उडाला आहे. हिमनदी कोसळल्याने भोटे कोशी नदीला आलेल्या अचानक पुरामुळे झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत तब्बल ७३४ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २,५०० नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्यांमध्ये ३०० हून अधिक भारतीय नागरिकांचा समावेश असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी दिली आहे. पुराचे पाणी आणि चिखलामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावांचा जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
