Sonu Sood supports Rajpal Yadav: राजपाल यादव काही दिवसांपासून चेक बाउन्स प्रकरणामुळे मोठ्या चर्चेत आहे. अभिनेता सध्या आर्थिक अडचणीत सापडला असून, काही दिवसांपूर्वी त्याने तिहार कारागृहात आत्मसर्मपण केले आहे.
२०१० मध्ये राजपाल यादवने एका चित्रपटासाठी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून पाच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. चित्रपट अपयशी ठरल्याने राजपाल यादवला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. कर्ज फेडू न शकल्याने या प्रकरणात मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने अभिनेता आणि त्याच्या पत्नीविरुद्ध अनेक चेक बाउन्स झाल्याबद्दल आणि त्यांचे पैसे परत न केल्याबद्दल केस दाखल केली.
२०१८ मध्ये दिल्लीतील दंडाधिकारी न्यायालयाने राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीला चेक बाउन्स प्रकरणात दोषी ठरवत अभिनेत्याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. २०१९ मध्ये सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीने या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याला आव्हान दिले. त्यानंतर शिक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आली; मात्र अभिनेत्याने वारंवार दिलेल्या मुदतीचे पालन केले नाही.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा म्हणाल्या होत्या की, अभिनेत्याला अनेक संधी देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्येक वेळी अभिनेत्याने कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यानंतर न्यायालयाने अभिनेत्याला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. आत्मसमर्पण करताना माझ्याकडे पैसे नाहीत, असे वक्तव्य अभिनेत्याने केले.
“त्याने इंडस्ट्रीमध्ये वर्षानुवर्षे…”
आता राजपाल यादवच्या मदतीसाठी सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला आहे. त्याने एक्सवर ट्विट करत लिहिले, “राजपाल यादव हा एक प्रतिभावान अभिनेता आहे. त्याने इंडस्ट्रीमध्ये वर्षानुवर्षे काम केले. त्याच्या अनेक भूमिका अविस्मरणीय आहेत.”
पुढे त्याने लिहिले, “कधी कधी टॅलेंटमुळे नाही, तर वेळ क्रूर असते. त्यामुळे आयुष्य आपल्यावर अन्याय करते. राजपाल यादव माझ्या चित्रपटाचा भाग असेल. मला वाटते की, या क्षणाला निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून आपण एकत्र असायला पाहिजेत. भविष्यात अभिनेता चित्रपटांचा भाग असेल त्याची छोटीशी सायनिंग अमाउंट द्यायला हवी. हे दानधर्म नाही. ही एक सन्मानाची गोष्ट आहे. जेव्हा आपल्यातील कोणीतरी अशा कठीण काळातून जात असते, तेव्हा तो एकटा नाही. ही इंडस्ट्रीने आठवण करून दिली पाहिजे. त्यामधून कळते की, आपण फक्त इंडस्ट्रीचा भाग नाही. त्यापेक्षाही एकमेकांसाठी जास्त काहीतरी आहोत.”
दरम्यान, आता राजपाल यादवच्या प्रकरणात पुढे काय होणार, सोनू सूदप्रमाणे आणखी कोणते कलाकार त्याच्या पाठीशी उभे राहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

