Sonu Sood Viral Video: सोनू सूद हा विविध भूमिका, चित्रपट यामधून प्रेक्षकांच्या भेटीला येतो. अभिनेता जितका त्याच्या भूमिकांसाठी ओळखला जातो. तितकाच तो समाजकार्यासाठी ओळखला जातो.

चेक बाउन्स प्रकरणात जेव्हा राजपाल यादव तुरुंगात गेला होता. त्यावेळी सोनू सूदने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर राजपालच्या आगामी काळातील प्रोजेक्टची साइनिंग अमाउंट त्याला द्यायला हवी, इंडस्ट्री म्हणून आपण एक आहोत, हे दाखवून द्यायला हवे, अशी पोस्ट शेअर करत मदतीचे आवाहन केले होते.

अभिनेता अनेक गरजू, देशाच्या कानाकोपऱ्यातील व्यक्तींना मदत करत करतो. त्यामुळे त्याची वेळोवेळी चर्चा होताना दिसते. आता मात्र, अभिनेता त्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे.

“दूध विकणाऱ्याला मात्र…”

सोनू सूदने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो जे बोलला आहे, ते अनेकांना विचार करण्यास भाग पाडत आहे. तो म्हणाला, “तुम्ही कधी विचार केला आहे का की दारू विकणाऱ्याला कुठेही जावे लागत नाही, दूध विकणाऱ्याला मात्र घरोघरी, गल्लोगल्ली जावे लागते. दूध विक्रेत्याला आपण विचारतो की त्याने दुधात पाणी मिसळले आहे का, दुसरीकडे आपण दारूमध्ये पाणी मिसळून तो पितो. “

“जे मीठासारखे खारट वाटतात, कडू बोलतात ते तुमचे चांगले मित्र असतात. त्यामुळे मिठात कधीही किडे होत नाहीत. पण, गोड पदार्थांमध्ये किडे होतात. तुम्ही कधी विचार केला आहे का, संपूर्ण आयुष्यभर तुम्ही त्या एका फोटोचे कौतुक करता. पण, त्या फोटोचा भार एका खिळ्यावर असतो. त्याला आपण विसरतो. आपल्यात जे नाहीत, ज्यांचे निधन झाले आहे त्यांना आठवताना आपण मेणबत्ती लावतो आणि वाढदिवसाला आपण मेणबत्ती विझवतो.”

“हजारों रुपये किंमत असलेले पैंजण आपण पायात घालतो आणि टिकली, ज्याची किंमत एक रुपया असते, ती आपण कपाळावर लावतो. कुराण आणि गीता कधीच भांडत नाहीत आणि जे लोक त्यांच्यासाठी भांडतात,त्यांनी कधीच हे धर्मग्रंथ वाचलेले नसतात. अजूनही वेळ आहे, माणसाने स्वत:मध्ये सुधारणा केली पाहिजे”, असे म्हणत सोनू सूदने त्याचे मत मांडले आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत अभिनेत्याचे कौतुक केले आहे. चाहत्यांसह अनेक कलाकारांनीदेखील त्याचे कौतुक केले आहे. अभिनेत्री भाग्यश्रीने लिहिले, “वाह! अगदी बरोबर बोलला आहेस.” तसेच फराह खाननेदेखील इमोजी शेअर करत कौतुक केले आहे.

एका नेटकऱ्याने लिहिले, “तू खरा जेंटलमन आहेस”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “हृदयस्पर्शी विचार आहेत”, एकाने लिहिले, “बरोबर आहे”, अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

आता सोनू सूद आगामी काळात कोणत्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.