Sooraj Pancholi Jiah Khan Suicide Case: बॉलीवू़डमधील काही कलाकारांचा मृत्यू हा नेहमी त्यांच्या चाहत्यांसाठी गूढ राहिले आहे. त्यांनी खरंच आत्महत्या केली होती की काही अपघात झाला होता, याची अनेकदा चर्चा रंगत असते. यामध्ये २५ व्या वर्षी आत्महत्या करणारी अभिनेत्री जिया खानचे नाव आवर्जून घेतले जाते. ‘गजनी’ व ‘हाऊसफुल’ या सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री जिया खान हिने २०१३ साली राहत्या घरी आत्महत्या केली होती. जियाने आत्महत्या केली त्यावेळी ती सूरज पांचोलीबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. यामुळे सूरजने तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.

जिया खान आत्महत्या प्रकरणामुळे अभिनेता सूरज पांचोली अडचणींमध्ये अडकला होता. सूरज पांचोलीवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आरोप करण्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणामुळे सूरज पांचोली हा चर्चेमध्ये आला होता. पण, एप्रिल २०२३ मध्ये विशेष CBI न्यायालयाने पुरेशा पुराव्याअभावी सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप सिद्ध झालेला नसल्याचे नमूद केले होते, मात्र यानंतरही अनेकदा या प्रकरणावरून चर्चा होते आणि यामध्ये सूरजचे नाव घेतले जाते. अखेर यासंबंधित सोशल मीडियावर पोस्ट करून सूरजने त्याचे मत व्यक्त केले आहे. १४ वर्षे कोर्टाच्या फेऱ्या मारल्यानंतर आता अजून कोणती उत्तरं बाकी आहेत, अशी पोस्ट त्याने केली आहे.

काय म्हणाला सूरज पांचोली?

सूरज पांचोलीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत जिया खान आत्महत्या प्रकरणामुळे त्याच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. सूरजने लिहिलं, “या प्रकरणासाठी मी तब्बल १४ वर्षे न्यायालयामध्ये लढा दिला असून या प्रकरणाचा निकाल हा सत्य पुरावे आणि कायद्याच्या आधारे लागला आहे. न्यायालयाने मला निर्दोष मुक्त केलंय, त्यामुळे ज्यांना स्वतःचं मत बनवण्यापूर्वी वस्तुस्थिती जाणून घ्यायची आहे, त्यांच्यासाठी न्यायालयाचे सर्व रेकॉर्ड्स उपलब्ध आहेत. सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी ते एकदा नक्की बघा.”

पुढे त्यानं लिहिलं, “ही दुर्दैवी घटना घडली तेव्हा मी फक्त २० वर्षांचा होतो. माझी तिच्याशी ओळख होऊन फक्त चार महिने झाले होते. तिच्या मनात नेमकं काय सुरू होतं याची मला पुसटशी कल्पनाही नव्हती. त्या वयात एखादी व्यक्ती इतक्या मोठ्या मानसिक धक्क्यातून जाऊ शकते, हे समजण्याइतका मीसुद्धा मॅच्युअर नव्हतो. पण, त्या एका घटनेनंतर माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. पुढची १४ वर्षे मी निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी लढत होतो. खरं तर त्या वयामध्ये मी आयुष्य घडवायला हवं होतं, पण त्याऐवजी मी फक्त कोर्टात जात होतो. माझ्या आयुष्यातील महत्त्वाची वयाची विशी आणि तिशी वाया गेली. त्यावेळी माझ्या मनात काय काय सुरू होतं आणि मला काय वाटतं होतं, हे मी कोणालाच सांगू शकत नाही.”

मलाही न्याय आणि आदर मिळावा – सूरज

पुढे तो म्हणाला, “मी निर्दोष आहे हे फक्त न्यायालय सिद्ध करू शकत होतं, तोच एक मार्ग होता. मी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला आणि १४ वर्षांनंतर न्यायालयाने मला निर्दोष मुक्तही केलं. पण, त्यानंतरही जर लोक मला दोषीच मानत असतील, तर मी अजून काय करावं हेच मला समजत नाही. मी इतकी वर्षे शांत राहिलो, याचा अर्थ असा नाही की कुणालाही माझ्याबद्दल काहीही लिहिण्याचा अधिकार दिला आहे. मला तिच्याबद्दल आदर असल्यामुळे आणि तिने माझ्याबरोबर तिच्या भावना शेअर केल्यामुळे मी त्या कधी उघडपणे सांगितल्या नाहीत. माझ्याबरोबर इतकं काही होऊनही मी तिचं खाजगी आयुष्य कधी सर्वांसमोर सांगितलं नाही. मी तिचा कायम आदर राखला. या बदल्यात मलाही न्याय आणि आदर मिळावा, हीच माझी छोटी अपेक्षा आहे.”

थोडं भावनिक, प्रामाणिकपणं आणि जबाबदारीनं पाहावं – सूरज

सूरज पांचोली म्हणाला, “याबाबत प्रत्येक चुकीचा समज किंवा गोष्ट (narrative) पुन्हा एकदा त्याच सगळ्या आठवणी समोर आणते, ज्यातून बाहेर पडण्यासाठी मी अनेक वर्षे खर्च केली आहेत. या गोष्टीकडे थोडं भावनिक, प्रामाणिकपणं आणि जबाबदारीनं पाहणं गरजेचं आहे. माझी बाजू कोणी मांडणार असेल किंवा माझी गोष्ट कोणी सांगणार असेल तर ती पूर्णपणे सांगावी, अशी माझी विनंती आहे.”