Sooraj Pancholi on Sushant Singh & Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नाव समोर आल्यानंतर अभिनेता सूरज पंचोली याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. आदित्य ठाकरे किंवा दिशा सालियन यांना कधीच भेटलो नसल्याचे सांगतानाच, सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या दिवशी त्याच्या घराबाहेर दिसल्याच्या चर्चांवर त्याने स्पष्टीकरण दिले. त्या दिवशी व्हिडीओमध्ये दिसणारा मी नव्हतोच असं त्याने सांगितलं. इतकंच नाही तर सुशांतचा जवळचा मित्र सिद्धार्थ गुप्ताने स्वतः कमेंट करत त्या दिवशी त्याच्याबरोबर कोण होतं, ते सांगितलंय.
“तू त्या सकाळी सुशांतच्या घराबाहेर दिसला होतास. माध्यमांनीही त्याचे व्हिडीओ प्रसारित केले होते. आता त्या सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत, पण तुझ्या आईचे खूप शक्तिशाली कनेक्शन्स आहेत, जे तुला वाचवू शकतात,” अशी कमेंट सूरज पंचोलीच्या या पोस्टवर करण्यात आली. त्याला सूरजने रिप्लाय दिला.
सूरज पंचोलीचं उत्तर
“सर्वांनाच माहीत आहे की त्याचं निधन झालं, त्यादिवशी त्याच्या घराबाहेर मी नव्हतोच. तो त्याचा जवळचा मित्र सिद्धार्थ गुप्ता होता. सिद्धार्थ आता तू या सर्व अफवांबद्दल बोलण्याची वेळ आली आहे. तू हे आधीच स्पष्ट करायला हवं होतं. मला काहीच न करता दोषी ठरवलं जातंय, याचा आता कंटाळा आला आहे,” असं सूरज पांचोलीने लिहिलं.

तो सूरज नव्हताच – सिद्धार्थ गुप्ता, सुशांत सिंह राजपूतचा मित्र
सूरजने ज्या सिद्धार्थ गुप्ताला टॅग केलंय, त्याने या पोस्टवर कमेंट केली आहे. सिद्धार्थ गुप्ताने लिहिलं, “त्या एका विशिष्ट व्हिडीओबाबत मला एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करायची आहे. व्हिडीओमध्ये गेटजवळ दिसणाऱ्या त्या दोन व्यक्ती मी आणि कुशल झवेरी आहोत. ती व्यक्ती सूरज नव्हती, किंवा व्हिडीओमध्ये दावा केला जात असलेली इतर कोणतीही दुसरी व्यक्ती नव्हती. कुशल आणि मी सुशांतच्या खूप जवळ होतो. ही बातमी समजताच आम्ही त्याला भेटण्यासाठी त्याच्या नवीन राहत्या घरी गेलो होतो. तिथे बाहेर खूप मोठी गर्दी आणि कडक सुरक्षा होती. आम्हाला आत जाण्याची परवानगी मिळाली नव्हती, त्यामुळे आम्ही शेवटी तिथून निघून गेलो होतो. तेव्हा करोना महामारी असल्यामुळे आम्ही दोघांनी मास्क घातले होते.”

पुढे सिद्धार्थने लिहिलं, “मी त्या वेळीच तपास यंत्रणांना याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. बाकी कोणत्याही गोष्टींवर चर्चा किंवा तपास सुरू असला, तरी या विशिष्ट व्हिडीओबद्दल मी ठामपणे सांगतोय की तिथे सूरज नव्हता. तिथे फक्त मी आणि कुशल होतो. मी स्वतः तिथे उपस्थित होतो, त्यामुळे हे स्पष्टीकरण देतोय आणि मला वाटतं की या व्हिडीओ क्लिपबद्दल चुकीची माहिती पसरवणं आता थांबायला हवं.”

दरम्यान, सूरजने दिशा सालियन व सुशांत सिंह प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याचं अनेकदा स्पष्ट केलंय. तसेच तपास यंत्रणांना याप्रकरणी तपासात पूर्ण सहकार्य करणार असून पुरावे नसताना आपलं नाव ओढून खोट्या गोष्टी पसरवल्या जाऊ नयेत, असंही त्याने म्हटलंय.
