Kangana Ranaut vs Saurav Das : शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर विद्यार्थ्यांचे जंतर मंतरवरील आंदोलन संपले. मात्र आता अभिनेत्री व राजकारणी कंगना रणौत आणि सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. ‘जेन झी’ आंदोलकांवर कंगना यांनी ‘गटर जनरेशन’ म्हणत टीका केली होती. आंदोलनातील तरुण मुलींबद्दलही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर सौरव दास यांनी कंगना यांना त्यांचा पक्षही गांभीर्याने घेत नसल्याचं प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा कंगना व सौरव यांच्यात जुंपली आहे. आता तर आपण तरुणपणीच्या हृतिक रोशनसारखे दिसत असल्याने कंगना टीका करत असल्याचं सौरवने म्हटलंय. इतकंच नाही तर कंगना यांचं बोलणं मानसिकदृष्ट्या स्थिर नसल्यासारखं वाटतं, असा टोलाही त्यांनी लगावला.
आपल्या मनात कंगनाबद्दल कोणताही वैयक्तिक द्वेष नाही, पण कंगनानेच या वादाला वैयक्तिक स्वरुप दिलं, असं ‘द मोजो स्टोरी’वर बरखा दत्त यांच्याशी बोलताना सौरव म्हणाले. “मला कंगनाशी वैयक्तिक काहीही देणंघेणं नाही. त्यांनीच जेन झी वर आणि आता माझ्यावर वैयक्तिक टिप्पणी केली आहे. मी आज माझ्या इन्स्टाग्राम स्टोरीवर म्हटल्याप्रमाणे, ‘कंगना, शांत राहा, आपण बसून बोलूया.'”
ते पुढे म्हणाले, “या देशात मुख्य अडचण अशी आहे की लोक आता एकमेकांशी बोलतच नाहीत. चर्चा आणि विचारांची देवाण-घेवाण कमी झाली आहे. बोलताना आपण आपल्या मर्यादेत राहिले पाहिजे. एवढंच मी कंगना यांना सांगेन.”
माझे मित्र म्हणतात मी तरुण हृतिक रोशनसारखा दिसतो – सौरव दास
कंगना रणौत वारंवार टीका करत आहेत, यावर सौरव म्हणाले की, त्यांच्या मित्रांनाही हाच प्रश्न पडलाय की त्या सातत्याने त्याला का लक्ष्य करत आहेत? “माझे मित्र मला मेसेज करून विचारत होते, ‘या तुझ्याबद्दल इतकं का बोलत आहेत?’ त्यापैकी एकाने तर म्हटलं की मी तरुणपणीच्या हृतिक रोशनसारखा दिसतो. हे माझ्या मित्रांनी मला सांगितलं. मलाही याचं आश्चर्य वाटलं. नाहीतर त्यांनी माझ्यावर इतकी वैयक्तिक टीका का करावी?”
शब्द जपून वापरा, सौरव दास यांचा कंगना रणौत यांना सल्ला
“जे काही असेल, पण मी एवढेच सांगेन – शब्द जपून वापरा. इतके संतापून बोलू नका. तुमचं बोलणं खूपच निराशेतून आल्यासारखं वाटतंय. ही मानसिकदृष्ट्या स्थिर असलेल्या व्यक्तीची भाषा नाही. या देशाच्या भविष्याबद्दल आणि तरुण पिढीबद्दल बोलण्यापूर्वी विचार करा. कारण शेवटी तुम्ही जनतेच्या सेवेसाठी आहात. सरकार जनतेच्या इच्छेने चालते आणि जनतेचा असा अपमान करू नये,” असं सौरव दास म्हणाले.
कंगना रणौत यांच्याबरोबर कॉफी पिण्यास तयार आहात का? असं विचारल्यावर सौरव म्हणाले, “अर्थात हो. आमच्या मनात भाजपा खासदारांसह कोणाबद्दलही कटुता नाही.”
कंगना रणौत आणि सौरव दास यांच्यातील वादाची सुरुवात कशी झाली?
कंगना रणौत यांनी ‘जेन झी’ आंदोलकांबद्दल टीका केली होती. “मी आयुष्यात कधीही एकाच ठिकाणी इतकी घाण पाहिली नाही. जेन झी आंदोलनांच्या या रील्स पाहून उल्टी आल्यासारखं वाटतं. ते अत्यंत वाईट भाषा बोलतात. सगळं त्रासदायक आणि दर्जाहीन आहे. यांना कोण जन्म देतंय आणि मोठं कोण करतंय? तुम्ही स्वतःला झुरळ म्हणवता आणि तसेच दिसता व वागतासुद्धा. यात कोणताही विरोधाभास नाही, तुम्ही फक्त जगासमोर तुमच्यातली घाण आणत आहात. या रील्स पाहून माझं मन अस्वस्थ झालंय, मला आता सोशल मीडियापासून दूर राहण्याची गरज आहे,” असं त्या म्हणाल्या होत्या.
सौरव दास यांनी कंगना रणौतना दिलं उत्तर
“कंगना यांना त्यांच्या पक्षातील लोकसुद्धा गांभीर्याने घेत नाहीत किंवा त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, मग आपण का द्यायला हवं? मला नाही वाटत की जेन झी, जेन अल्फा किंवा आजची कोणतीही तरुण पिढी त्यांना गांभीर्याने घेते किंवा त्यांचं ऐकते,” असं प्रत्युत्तर सौरव दास यांनी दिलं होतं.
कंगना रणौत यांची सौरववर वैयक्तिक टीका
यानंतर कंगना यांनी इन्स्टाग्रामवर सौरव यांना प्रत्युत्तर दिलं आणि त्यांचं वय काढलं. “मी नुकतंच त्याच्याबद्दल गूगलला विचारलं. तो २८ वर्षांचा आहे, तरीही तो विद्यार्थी असल्याचा दावा करतो. तो स्वतःला विद्यार्थी कसा काय म्हणवतो, हेच मला समजत नाही! त्याच्या वयाची असताना मला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.”
कंगना यांनी सौरव यांच्यावर वैयक्तिक टीका केली. त्यांना निरुपयोगी आणि बेरोजगार म्हटलं. “प्रिय सौरव, तुझ्या समस्या वैयक्तिक आहेत. तू विद्यार्थी नाहीस; तू फक्त एक निरुपयोगी माणूस आहेस. आधी एखादे कौशल्य शिकण्यापासून सुरुवात कर. सुरुवात करण्यासाठी ही एक चांगली जागा आहे.”
