Rajkummar Rao as Sourav Ganguly Biopic Release Date: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि ‘दादा’ या नावाने लोकप्रिय असलेला सौरव गांगुली याचा आज वाढदिवस आहे. ८ जुलै १९७२ रोजी कोलकाता येथे जन्मलेला सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. ‘ऑफ साईडचा किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौरव गांगुलीने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने अनेक विक्रम रचले. खेळाडू, कर्णधार आणि नंतर बीसीसीआय अध्यक्ष म्हणून त्याचं क्रिकेटशी कनेक्शन कायम राहिलं. याच ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’च्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या ५४ व्या वाढदिवशी बायोपिकचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. मात्र, पोस्टरच्या खराब एडिटिंगवरून चित्रपटाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
सौरवच्या बायोपिकची घोषणा जवळपास ५ वर्षांपूर्वी झाली होती. तेव्हापासून या दिग्गज क्रिकेटपटूच्या भूमिकेत कोण दिसणार? याबद्दल चर्चा सुरू होती. रणबीर कपूरसह अनेक अभिनेत्यांच्या नावाबद्दल सोशल मीडियावर चर्चा रंगायची. पण अखेर पोस्टरमधून सौरव गांगुलीच्या भूमिकेत कोण असेल ते स्पष्ट झालं आहे.
सौरव गांगुलीच्या वाढदिवशी चित्रपटाचं नाव अन् रिलीज डेटची घोषणा
सौरव गांगुलीच्या क्रिकेट प्रवासावर आधारित चित्रपटाचं नाव ‘दादा: द सौरव गांगुली स्टोरी’ असं आहे. या चित्रपटात सौरव गांगुलीची भूमिका बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव साकारत आहे. आज सौरव गांगुलीच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाचं पहिलं पोस्टर राजकुमार रावने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलं. या पोस्टरमध्ये सौरव गांगुलींचा शर्टलेस सेलिब्रेशनचा लूक रिक्रिएट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे. ‘दादा’ हा चित्रपट १४ मे २०२७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ‘दादा’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा असं कॅप्शन लिहून राजकुमार रावने ही पोस्ट केली आहे.
पाहा पोस्टर
सौरव गांगुली यांनीही पोस्टर शेअर करत हे वाढदिवसाचं सर्वोत्तम गिफ्ट असल्याचं म्हटलंय.
राजकुमार रावने हे पोस्टर शेअर केल्यानंतर त्यावर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. काहींना हे पोस्टर आवडलंय, पण काहींना मात्र पोस्टरचं एडिटिंग अजिबात आवडलेलं नाही. ‘फार वेळ झालेला नाही, पोस्टर डिलिट करा’, ‘यापेक्षा तर एआय चांगलं एडिट करतं,’ ‘राजकुमार राव दादा कमी मुनाफ पटेल जास्त वाटतोय’, ‘या भूमिकेत राजकुमार राव अजिबात योग्य निवड वाटत नाहीये’, ‘दादाचे इतके वाईट दिवस नाही आले की त्यांची भूमिका राजकुमार राव करेल,’ ‘सगळं मिसमॅच वाटतंय,’ अशा कमेंट्स या पोस्टरवर पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, सौरव गांगुली यांच्या बायोपिकमधील इतर कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे अनेक क्रिकेटपटूंच्या भूमिकांमध्ये कोणते कलाकार दिसणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. तूर्तास तरी राजकुमार राव सौरव गांगुलींच्या लूकमध्ये चाहत्यांना फारसा आवडलेला नाही.
