पूजा एंटरटेनमेंटचा आगामी चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. तसेच, या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिका साकारणार आहेत आणि प्रेक्षक या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत. अशातच प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घालत आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी यातील खलनायकाची झलक दाखवली आहे.
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्याबरोबरच आता या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन झळकणार आहे. पृथ्वीराज यामध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या भूमिकेचं नाव कबीर असून अक्षय कुमारने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून पृथ्वीराजचं या चित्रपटात स्वागत केलं आहे.
आणखी वाचा : Vadh Movie review : कथेच्या बाबतीत मार खाणारा पण, दर्जेदार अभिनयाने उचलून धरलेला थरारपट
या घोषणेबाबत बोलताना अभिनेता जॅकी भगनानी म्हणाला ”बडे मियाँ छोटे मियाँ’च्या कलाकारांमध्ये पृथ्वीराज सुकुमारनचा सहभाग हि एक उत्कृष्ट बाब आहे. तसेच, त्याची खलनायकाची व्यक्तिरेखा या चित्रपटात आणखी धमाल करेल अशी अपेक्षा आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफरही या भूमिकेबद्दल खुलासा करताना म्हणाला “अत्यंत प्रतिभावान कलाकार पृथ्वीराजबरोबर काम करण्यास मी उत्सुक आहे. या अॅक्शन एंटरटेनर चित्रपटात अशा सुपरस्टारबरोबर काम करताना एक वेगळाच अनुभव मिळेल.”
या चित्रपटाचे शूटिंग पुढच्या वर्षी सुरू होणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. १९९८ साली याच नावाचा एक दिग्दर्शक डेविड धवन यांचा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यात अमिताभ बच्चन आणि गोविंदा हे मुख्य भूमिकेत होते. शिवाय रविना टंडन, रम्या कृष्णन, अनुपम खेर, कादर खान हे कलाकार सहाय्यक भूमिकेत होते.