१८ जून १९६२ ही तारीख चित्रपट रसिक कधीही विसरु शकत नाहीत. कारण याच दिवशी प्रदर्शित झाला होता राज कपूर, वैजयंती माला आणि राजेंद्र कुमार यांच्या प्रमुख भूमिका असलेला संगम हा चित्रपट. राज कपूर यांच्या RK बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. आर.के. प्रॉडक्शनचा हा पहिला रंगीत चित्रपट होता. एवढंच नाही तर भारतातला पहिला दोन इंटरव्हलचा सिनेमा म्हणूनही संगम प्रसिद्ध आहे. शो मन राज कपूर यांनी त्यावेळी ८० लाख रुपये खर्च करुन सिनेमा तयार केला होता आणि या अजरामर प्रेम त्रिकोणाने ८ कोटी रुपये बॉक्स ऑफिसवर त्या काळात कमावले होते. याच चित्रपटाशी संबंधित एक खास किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

संगम ची कथा काय होती?

‘संगम’ चित्रपट हा सुंदर (राज कपूर), राधा (वैजयंती माला) आणि गोपाल (राजेंद्र कुमार) हे तिघंही लहानपणापासूनचे मित्र असतात. तरुण पणात सुंदरला राधा आवडते, त्याच्यासाठी ती त्याचं विश्व असते, त्याला तिच्याविषयी आकर्षण, प्रेम, आपुलकी सारंकाही असतं. पण राधाला गोपाल आवडत असतो, गोपालला राधा आवडत असते. एक दिवस सुंदर आपल्या मनातल्या राधाविषयीच्या भावना गोपालकडे बोलून दाखवतो. ज्यानंतर आपल्या मित्रासाठी म्हणजेच सुंदरसाठी गोपाल राधाचा त्याग करायचा निर्णय घेतो. पण सुंदर भारतीय वायुदलात असतो, त्याची रवानगी एका मिशनवर होते. मिशनला जाण्याआधी तो गोपालकडून वचन घेतो की राधाच्या आयुष्यात इतर कुठलाही पुरुष येणार नाही याची काळजी घे. कारण गोपाल आणि सुंदर दोघंही चांगले मित्र असतात. सुंदर मोहिम फत्ते करतो पण त्याच्या विमानाचा अपघात होतो. सुंदर अपघातात मारला गेला म्हणून बातमी येते. त्याला परमवीर चक्रही जाहीर होतं. या बातमीमुळे सुंदरचे मित्र असलेले राधा आणि गोपाल दोघेही खूप दुःखी होतात, त्यानंतर गोपाल आणि राधा जवळ येतात. गोपालने काही पत्र राधाला लिहिलेली असतात पण त्यावर तो नाव लिहित नाही. दोघांचंही लग्न होणार असतं पण सुंदर सुखरुप परततो आणि गोपाल पुन्हा एकदा स्वतःच्या प्रेमाचा म्हणजेच राधाचा त्याग करतो. सुंदर आणि राधा मधुचंद्राहून परतात तेव्हा एक दिवस अचानक सुंदरला ती निनावी पत्र सापडतात. मग तो खूप चिडतो, दारुच्या आहारी जातो. अशात एक दिवस त्याला हेदेखील कळतं की पत्र लिहिणारा दुसरा कुणी नाही तर गोपालच आहे. त्याचा त्रागा आणखी वाढतो. ज्यानंतर गोपाल सुंदरच्या पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून स्वतःचा शेवट करतो आणि मरताना राधाचा हात त्याच्या हाती देतो. ही कथा लोकांना फारच आवडली होती. राज कपूर यांनीच आपल्या खास शैलीत चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. सुंदरची भूमिका राज कपूर जगले आहेत. वैजयंती माला आणि राजेंद्र कुमार यांचीही कामं उत्तम आहेत.

Sangam Movie News
संगम चित्रपटात वैजयंतीमाला, राज कपूर, राजेंद्र कुमार यांच्या भूमिका आहेत. (फोटो-)

संगमची गाणी ही संगमची सर्वात मोठी जमेची बाजू

‘हर दिल जो प्यार करेगा, वो गाना गायेगा’, ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर के तुम नाराज ना होना’, ‘दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा’, ‘बोल राधा बोल संगम होगा के नहीं’, ‘मै का करुं राम मुझे बुढ्ढा मिल गया’, ‘ओ मेरे सनम, ओ मेरे सनम’, ‘ओ मेहबुबा’ ही सगळी एकाहून एक सरस गाणी लोकांच्या तोंडी आजही आहेत. शंकर जयकिशन यांचं संगीत, मुकेश, लता मंगेशकर, मोहम्मद रफी,महेंद्र कपूर यांनी ही गाणी गायली आहेत. यातल्या बोल राधा बोल या गाण्याचा खास किस्सा आहे. राज कपूर यांनी जी तार वैजयंती माला यांना पाठवली त्यावरुन गाणं करायचं ठरलं आणि गीतकार शैलेंद्र यांनी ते गाणं लिहिलं. हे गाणं कसं जन्माला आलं ते जाणून घेऊ.

बोल राधा बोल गाण्याचा किस्सा नेमका आहे तरी काय?

राज कपूर यांनी संगम चित्रपटातील राधा या भूमिकेसाठी वैजयंती माला यांच्याकडे विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं नाही. राज कपूर यांनी फोनची वाट पाहिली, तरीही उत्तर मिळालं नाही. ज्यानंतर राज कपूर यांनी वैजयंती माला यांना तार पाठवली. त्यात लिहिलं होतं बोल राधा बोल संगम होगा के नहीं.. ज्यावर काही वेळाने वैजयंती माला यांचं उत्तर आलं होगा.. होगा.. होगा. मग राज कपूर यांना वाटलं की यावर गाणं तयार करावं आणि अशा रितीने बोल राधा बोल संगम होगा के नहीं हे गाणं जन्माला आलं आणि आजही ते गाणं लोकांच्या ओठांवर अगदी सहज येतं.

Sangam Movie News
बोल राधा बोल संगम होगा के नहीं.. गाण्याचा किस्सा नेमका काय? (फोटो-सोशल मीडिया)

दोन मध्यंतराचा चित्रपट

संगम हा हिंदी चित्रपटसृष्टीतला दोन मध्यंतरांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाची लांबी २३८ मिनिटं म्हणजेच ३ तास ५८ मिनिटं इतकी होती. राज कपूर, वैजयंती माला आणि राजेंद्र कुमार यांच्या चित्रपटातली गाणीही सदाबहार ठरली. पुढे याच चित्रपटावरुन सुधाकर बोकाडे यांनी माधुरी दीक्षित, संजय दत्त, सलमान खान या कलाकारांना घेऊन साजन हा चित्रपटही केला होता.