Sridevi Birth Anniversary : आपल्या खास अंदाज, अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवींनी बॉलीवूडमध्ये कधीही न पुसता येणारी ओळख निर्माण केली आहे. आज त्या या जगामध्ये नसल्या तरी त्यांच्या सिनेमांची आणि अभिनयाची चर्चा रंगते. आज श्रीदेवींची जयंती असून यानिमित्ताने चाहत्यांनी त्यांची आठवण काढली आहे. श्रीदेवींचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असताना त्यांनी शाहरुख खानच्या तीन सिनेमांना नकार दिला होता. एवढंच नाही तर त्यांनी अमिताभ बच्चन व अनिल कपूर यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करण्यासही नकार कळवला होता.
श्रीदेवी नेहमीच हटके आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट घेऊन येत असत, त्यामुळे प्रेक्षकांमध्येही त्यांच्या चित्रपटांबाबत उत्सुकता निर्माण होत असे. श्रीदेवींनी बॉलीवूडमध्ये ३०० हून अधिक सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या. त्यांनी ‘चांदनी’, ‘मिस्टर इंडिया’, ‘सदमा’ यांसारख्या चित्रपटांमधून अभिनयाची वेगळी छाप पाडली. सिनेमामध्ये श्रीदेवी असल्या की चित्रपट सुपरहिट होतो, असं जणू समीकरणच बनलं होतं, त्यामुळे श्रीदेवींना अनेक सिनेमांच्या ऑफर येत असत. शाहरुख खानच्या ‘डर’, ‘बाजीगर’ आणि ‘मोहब्बते’ या चित्रपटांना श्रीदेवींनी नकार दिला होता.
मला शाहरुख खानची भूमिका करायला आवडेल – श्रीदेवी
शाहरुख खानच्या सुपरहिट सिनेमांमध्ये ‘डर’ या सिनेमाचे नाव आवर्जून घेतले जाते. याचे दिग्दर्शक यश चोप्रा यांना सिनेमामध्ये श्रीदेवीने किरण हे पात्र साकारावं अशी इच्छा होती. पण, श्रीदेवीने या सिनेमाला नकार दिला. यानंतर त्यांनी स्वतः एका मुलाखतीमध्ये ‘डर’ सिनेमाला नकार का दिला याचे कारण सांगितले होते. श्रीदेवी म्हणालेल्या, “‘लम्हे’ आणि ‘चांदनी’ हे चित्रपट केल्यानंतर ‘डर’ सिनेमातील भूमिका अगदीच सामान्य वाटत होती. पण, शाहरुख खानची भूमिका मला करायला आवडली असती, कारण – त्यामध्ये काहीतरी वेगळं होतं. जुही चावलाने किरणची भूमिका साकारली, कारण ती तिच्यासाठी अगदी योग्य होती, पण माझ्यासाठी ती योग्य नव्हती. कारण अशा पद्धतीच्या भूमिका मी खूप वेळा साकारल्या आहेत.”
याचबरोबर श्रीदेवीने शाहरुख खानच्या आणखी दोन जबरदस्त चित्रपटांना नकार दिला होता. श्रीदेवी यांना ‘बाजीगर’ आणि ‘मोहब्बते’ या दोन्ही चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. ‘बाजीगर’मध्ये त्यांना डबल रोल करण्याची ऑफर मिळाली होती, पण सिनेमाची स्क्रीप्ट न आवडल्यामुळे श्रीदेवीने या सिनेमाला नकार दिला. त्यानंतर काजोल व शिल्पा शेट्टीने या दोघींनी ‘बाजीगर’मध्ये काम केले. तसेच ‘मोहब्बते’ सिनेमाची ऑफरसुद्धा तिने नाकारली होती.
अमिताभ बच्चन व अनिल कपूर यांनाही दिलेला नकार
फक्त शाहरुख खानच्या नाही तर श्रीदेवीने अनिल कपूर व अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांनाही नकार दिला होता. तिने अनिल कपूरच्या ‘बेटा’ चित्रपटाची ऑफर नाकारली. यापूर्वी अनेकदा तिने अनिल कपूरबरोबर काम केल्याने तिने पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करण्यास नकार दिला. श्रीदेवीने नकार दिल्यानंतर ही भूमिका माधुरी दीक्षितने साकारली. याचबरोबर अमिताभ बच्चन यांच्या ‘बागबान’ सिनेमाला श्रीदेवीने नकार दिला होता. त्यावेळी पुन्हा एकदा सिनेविश्वामध्ये येण्यास तयार नसल्याने तिने नकार कळवला होता. यामुळे हेमा मालिनीने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘बागबान’ सिनेमा केला आणि पुढे हाच सिनेमा एक ‘कल्ट’ सिनेमा ठरला.
