श्रीदेवी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्यांनी अनेक हिट चित्रपट देत देशभरातली प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मात्र यशस्वी कारकिर्द असलेल्या श्रीदेवींचा शेवट अत्यंत वेदनादायी होता. त्यांच्या कुटुंबालाही या काळात खूप कठीण परिस्थितीतून जावं लागलं. एवढंच काय तर त्यांचे पती बोनी कपूर यांना तर परदेशात चौकशीला सामोरं जावं लागलं.
काल, १३ ऑगस्ट रोजी श्रीदेवींच्या जन्मदिन होता. त्यामुळे या दिग्गज अभिनेत्रीच्या आठवणींना त्यांचे चाहते उजाळा देत आहेत. याचदरम्यान त्यांचं निधन झालं तेव्हा निर्माण झालेल्या परिस्थितीचीही पुन्हा चर्चा होत आहे. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार २४ फेब्रुवारी २०१८ रोजी वयाच्या ५४व्या वर्षी दुबईतील जुमेराह एमिरेट्स टॉवर्समधील हॉटेलच्या खोलीतील बाथटबमध्ये त्या बेशुद्धावस्थेत आढळल्या होत्या. तपासानंतर दुबईच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मृत्यूचं कारण बेशुद्ध झाल्यानंतर बाथटबमध्ये बुडून अपघाती मृत्यू असं निश्चित केलं होतं.
या घटनेनंतर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला होता. श्रीदेवींचे पती आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्यावरही दुबईतील अधिकाऱ्यांनी त्यांच्या निधनाच्या परिस्थितीचा तपास करताना मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले होते. काही वर्षांनंतर बोनी कपूर यांनी त्यांच्याकडून करण्यात आलेल्या चौकशीबाबत खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, दुबई पोलिसांनी त्यांची सुमारे २४ तास चौकशी केली होती आणि त्यांच्यावर लाई डिटेक्टर टेस्टही (lie-detector test) करण्यात आली होती.
२४ ते ४८ तास झालेली चौकशी – बोनी कपूर
दिग्दर्शक बोनी कपूर यांनी २०२३ मध्ये ‘द न्यू इंडियन’ला दिलेल्या मुलाखतीत श्रीदेवींच्या निधनाबद्दल भाष्य केलं होतं. ते म्हणाले, “हा अपघाती मृत्यू होता. दुबई पोलिसांकडून माझी चौकशी आणि तपास सुरू असताना मी जवळपास २४ ते ४८ तास याबद्दल सतत बोलत होतो. त्यानंतरच दुबई पोलिसांनी मला क्लीन चिट दिली.” त्यांनी पुढे सांगितलं की, तपासादरम्यान कोणतेही गैरप्रकाराचे पुरावे आढळले नाहीत. बोनी कपूर यांच्या म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की भारतीय माध्यमांकडून मोठा दबाव असल्यामुळे ही चौकशी आणि प्रक्रिया करावी लागली.
ते म्हणाले, “खरं तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की, भारतीय माध्यमांकडून खूप दबाव असल्यामुळे आम्हाला हे सगळं करावं लागलं. तपासादरम्यान कोणताही गैरप्रकार झाल्याचे पुरावे आढळले नाहीत.” बोनी कपूर यांनी पुढे खुलासा केला की, या तपासात लाई डिटेक्टर टेस्टचाही समावेश होता. ते म्हणाले, “माझी चौकशी करण्यात आली, त्यात लाई डिटेक्टर टेस्टचाही समावेश होता. या टेस्टचा जो अहवाल आला, त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की हा बाथटबमध्ये बुडून झालेला अपघाती मृत्यू होता.”
श्रीदेवींच्या निधनाच्या वेळी दुबईतील माध्यमांनी केलेल्या वृत्तांमधून तपासाबाबत आणखी काही माहिती समोर आली होती. ‘गल्फ न्यूज’च्या वृत्तानुसार, दुबई पोलिसांनी बोनी कपूर यांना चौकशीसाठी बुर दुबई पोलीस ठाण्यात नेलं होतं. तिथे त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आणि त्यानंतर त्यांना पुन्हा हॉटेलमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, त्यावेळी ‘खलीज टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, बोनी कपूर यांनी पोलिसांच्या नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून आपला जबाब नोंदवला होता. त्यांना पुढील चौकशीसाठी त्यानंतरच्या सोमवारी पुन्हा बोलावण्यात आलं नव्हतं. त्या काळात माध्यमांमध्ये बोनी कपूर यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावल्याच्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या; मात्र, दुबई पोलिसांच्या सूत्रांनी या वृत्तांना निराधार ठरवलं होतं.
श्रीदेवींच्या मृत्यूचा तपास केवळ जबाब नोंदवण्यापुरता मर्यादित नव्हता. पोस्टमॉर्टमनंतर दुबई पोलिसांनी हे प्रकरण पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी दुबई पब्लिक प्रॉसिक्युशनकडे सोपवलं. आवश्यक तपास आणि मृतदेह भारतात पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत श्रीदेवींचा मृतदेह अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला होता. २७ फेब्रुवारी रोजी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अभिनेत्रीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. सर्व नियमित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुबई पब्लिक प्रॉसिक्युशनने प्रकरण बंद केलं. फॉरेन्सिक अहवालानुसार, बेशुद्ध झाल्यानंतर बाथटबमध्ये बुडणे हे त्यांच्या मृत्यूचं कारण सांगण्यात आलं होतं.
बोनी कपूर यांनी २०२३ मध्ये दिलेल्या मुलाखतीत पुढे सांगितलं होतं की, कमी रक्तदाबामुळे श्रीदेवी यापूर्वीही काही वेळा अचानक चक्कर येऊन बेशुद्ध झाल्या होत्या. त्यांचं डाएटही खूप कडक होतं. त्या वजन आणि लूकबाबत विशेष काळजी घेत असल्याने आहारातून मीठ पूर्णपणे टाळत होत्या. बोनी कपूर यांच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी श्रीदेवींना अनेकदा आहारातून मीठ पूर्णपणे वगळू नका, असा इशारा दिला होता कारण त्यांना लो ब्लड प्रेशरची समस्या होती. मात्र, चेहऱ्यावर सूज येऊ नये आणि शरीर, लूक मेंटेन राहावा, या कारणामुळे त्या मीठ टाळत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
