नाना पाटेकर यांनी नायकापासून खलनायकापर्यंत आणि विनोदी भूमिकांपासून देशभक्तीपर भूमिकांपर्यंत विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, त्यांच्या एका चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री श्रीदेवी यांनी केली होती?

श्रीदेवी यांनी निर्मिती केलेल्या ‘शक्ती: द पॉवर’ या चित्रपटात नाना पाटेकर यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. श्रीदेवी यांनी पती बोनी कपूर यांच्याबरोबर या चित्रपटाची निर्मिती केली होती. ‘शक्ती: द पॉवर’ हा चित्रपट २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नाना पाटेकर यांच्याबरोबर करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता चित्रपट

नाना पाटेकर यांचा हा ॲक्शन चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही. मात्र, नंतर प्रेक्षकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आणि कालांतराने या चित्रपटाला कल्ट चित्रपट म्हणून ओळख मिळाली.

‘शक्ती’ चित्रपटाची कथा काय?

या चित्रपटात करिश्मा कपूरने नंदिनीची भूमिका साकारली आहे. नंदिनी तिचा पती शेखर आणि लहान मुलासह कॅनडामध्ये राहत असते. भारतातील त्यांच्या गावात अशांतता पसरल्याची बातमी समजल्यानंतर शेखर आपल्या कुटुंबासह तिथे परततो. मात्र, तिथे आल्यावर नंदिनीला समजतं की शेखरचे वडील नरसिंह हे एका शक्तिशाली आणि भांडखोर कुटुंबाचे प्रमुख आहेत.

हिंसाचारात शेखरचा मृत्यू झाल्यानंतर नंदिनी आपल्या मुलाला घेऊन कॅनडाला परतण्याचा निर्णय घेते. मात्र, नरसिंह तिला मुलाला सोबत नेण्याची परवानगी देत नाहीत. त्याला कुटुंबाचा वारस बनवण्याची त्यांची इच्छा असते. अशा परिस्थितीत नंदिनी आपल्या मुलाला या सगळ्यापासून वाचवू शकेल का? ती गावातून पळून जाण्यात यशस्वी होईल का? की मायलेकांच्या नशिबात काही वेगळंच लिहिलेलं असेल? या प्रश्नांची उत्तरं चित्रपट पाहिल्यावरच मिळतील.

‘शक्ती: द पॉवर’ हा २००२ मध्ये प्रदर्शित झालेला ॲक्शन चित्रपट आहे. कृष्णा वामसी यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात करिश्मा कपूर, नाना पाटेकर आणि संजय कपूर मुख्य भूमिकेत आहेत. तर शाहरुख खान, दीप्ती नवल, ऋतू शिवपुरी, अनुपम श्याम आणि प्रकाश राज यांनी सहायक भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट तुम्ही झी ५ वर पाहू शकता.