श्रीदेवी यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. हिंदीसह त्यांनी अनके दाक्षिणात्य चित्रपटांतही काम केलं आहे. त्यांच्याबरोबर काम करणं अनेकांचं स्वप्न होतं. श्रीदेवींनी फक्त त्यांच्या अभिनयामुळेच नाही तर त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे आणि प्रमाणिकपणानेही अनेकांची मनं जिंकली. श्रीदेवी कामाच्याबाबती खूप शिस्तप्रिय होत्या. इतक्या की एकदा त्यांनी आजारपणातही शूटिंग केलं होतं.

३७ वर्षांपूर्वी श्रीदेवींना पावसातील एका गाण्याचं चित्रीकरण करायचं होतं. त्यावेळी त्या तापाने फणफणत होत्या. मात्र, प्रकृती अस्वस्थ असूनही त्यांनी विश्रांती घेण्याऐवजी त्या गाण्याचं शूटिंग करण्याचा निर्णय घेतला. पावसात भिजत असतानाही आणि प्रचंड ताप असतानाही श्रीदेवींनी आपल्या चेहऱ्यावरील हावभावांतून वेदना किंवा त्रास अजिबात दिसू दिला नाही. त्यांच्या अभिनयातील समर्पण आणि कामाप्रतीची निष्ठा या प्रसंगातून स्पष्टपणे दिसून येते.

१०३ डिग्री तापात केलं होतं या गाण्याचं चित्रीकरण

श्रीदेवींनी १०३ डिग्री ताप असतानाही ज्या गाण्याचं चित्रीकरण केलं होतं, ते म्हणजे ‘ना जाने कहाँ से आई है’. हे गाणं १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चालबाज’ चित्रपटातील असून, त्यात बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता सनी देओल त्यांच्याबरोबर झळकला होता. या गाण्याचं चित्रीकरण सुरू असताना श्रीदेवींची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना ताप होता. तरीही त्यांनी शूटिंग न थांबवता हे गाणं चित्रित केलं.

‘चालबाज’साठी श्रीदेवींना मिळाला होता फिल्मफेअर पुरस्कार

‘चालबाज’ हा चित्रपट श्रीदेवींच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात त्यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. चित्रपटात सनी देओल आणि रजनीकांत हे दोघेही यामध्ये प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटातील अभिनयासाठी श्रीदेवींना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

‘चालबाज’ हा त्या वर्षातील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला होता. श्रीदेवींना त्यांच्या अभिनयासाठी असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. फक्त अभिनयच नव्हते तर त्यांनी त्यांच्या सौंदर्यानेही अनेकांची मनं जिंकली होती.