श्रीदेवी या भारतीय सिनेमातील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेत्रींपैकी एक होत्या. मात्र, चिरतरुण राहण्यासाठी त्यांना काही आव्हानांचा सामना करावा लागला. ‘चालबाज’ या चित्रपटाचे दिग्दर्शक पंकज पराशर यांनी एका मुलाखतीत श्रीदेवींबरोबर घडलेल्या एका घटनेची आठवण सांगितली आहे.
श्रीदेवी आणि अक्षय कुमार अभिनीत ‘मेरी बीवी का जवाब नहीं’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली होती. पंकज पराशर यांनी ‘फ्रायडे टॉकीज’ला दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्यानंतर श्रीदेवींनी अतिशय कडक डाएट सुरू केलं होतं. या क्रॅश डाएटचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला. शूटिंगदरम्यान श्रीदेवी अचानक बेशुद्ध पडल्या आणि त्यांना दुखापतही झाली, असा दावा पंकज पराशर यांनी केला आहे.
वजन कमी करण्यासाठी होता दबाव
पंकज पराशर यांच्या म्हणण्यानुसार, राम गोपाल वर्मा यांच्या १९९१च्या तेलुगू चित्रपट ‘क्षण क्षणम’मध्ये काम करताना श्रीदेवींवर वजन कमी करण्यासाठी दबाव होता. वर्मा यांनी त्यांना वारंवार वजन कमी करण्यास सांगितल्याचा दावा पराशर यांनी केला. यानंतर श्रीदेवींनी अत्यंत कडक डाएट सुरू केलं आणि मीठ खाणंही पूर्णपणे बंद केलं. त्यामुळे त्यांचा रक्तदाब मोठ्या प्रमाणात कमी झाला. पुढे ‘मेरी बीवी का जवाब नहीं’च्या शूटिंगदरम्यान श्रीदेवी अचानक बेशुद्ध पडल्या. त्या टेबलावर डोक्याने आदळल्या आणि सुमारे २० मिनिटे बेशुद्ध होत्या, असं पराशर यांनी सांगितलं.या अपघातात त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली आणि एक दातही तुटल्याचा प्रसंग त्यांनी सांगितला.

या घटनेनंतर श्रीदेवींनी शूटिंगमधून काही काळ ब्रेक घेतल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. मात्र, अखेरीस हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. पंकज पराशर यांनी सांगितल्यानुसार, चित्रपटाच्या फायनान्सरने नंतर प्रोजेक्टमधून माघार घेतली, तर निर्मात्याचंही त्यानंतर निधन झालं. एकामागून एक अडचणी येत राहिल्याने अखेरीस पराशर यांना हा प्रोजेक्ट सोडावा लागला.तब्बल काही वर्षांनंतर हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला. त्यावेळी याआधी शूट केलेलं फुटेजच चित्रपटात वापरण्यात आलं.


अक्षय कुमारनेही ‘कॉफी विथ करण’च्या एका जुन्या एपिसोडमध्ये या अपूर्ण राहिलेल्या चित्रपटाची आठवण सांगितली होती. त्याने सांगितलं होतं की चित्रपटाचा क्लायमॅक्स कधीच पूर्ण झाला नव्हता. त्यामुळे अंतिम आवृत्तीत एक लिखित संदेश देण्यात आला, ज्यामध्ये पात्रांनी अखेरीस बदला घेतल्याचं सांगितलं होतं.
