Star Screen Awards Throwback : स्क्रीन अवॉर्डस् सोहळा लवकरच येत्या ५ एप्रिलला पार पडणार आहे. अनेक चित्रपट, सीरिज आणि कलाकारांना यासाठी नामांकनं मिळाली आहेत. यापूर्वी पार पडलेल्या स्क्रीन पुरस्कार सोहळ्यातसुद्धा अनेक कलाकारांना पुरस्कार मिळाले होते. यादरम्यान फक्त पुरस्कार नाही तर कलाकारांमधील गमती जमतींनीही प्रेक्षकांचं लक्ष वेधलेलं आणि पुरस्कार सोहळ्याला वेगळी रंगत आलेली.
आतापर्यंत स्क्रीन अवॉर्डसचे अनेक पुरस्कार सोहळे पार पडले आहेत. अशातच आता लवकरच ‘चेतक स्क्रीन अवॉर्डस् २०२६’ पार पडणार आहे. यानिमित्त आम्ही तुम्हाला आधीच्या सोहळ्यांमधील काही गमती जमती सांगत आहोत. २२व्या स्क्रीन अवॉर्ड पुरस्कार सोहळ्यात करण जोहर व कपिल शर्मा यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली होती. त्यावेळी सलमान खान व करिना कपूर यांच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटानं अनेक पुरस्कार पटकावले होते.
२२व्या स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात कबीर खान यांच्या ‘बजरंगी भाईजान’ला आनंद एल राय यांचा ‘तनु वेड्स मनू रिटर्न्स’, सूजित सरकार यांचा ‘पीकू’, जोया अख्तरचा ‘दिल धडकने दो’, संजय लीला भनसाळींचा ‘बाजीराव मस्तानी’ आणि मेघना गुलजार यांचा ‘तलवार’ या चित्रपटांना नामांकनं होती. पुरस्कार देण्यासाठी करण जोहरनं सचिन सचदेवा यांना मंचावर आमंत्रित केलं होतं. पुरस्कार स्वीकारताना कबीर खान यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
कबीर खान पुरस्कार स्वीकारताना म्हणालेले, “स्क्रीन अवॉर्डस् धन्यवाद, सलमान खान तुझेसुद्धा खूप आभार. इतर सगळ्याच कलाकारांचे खूप खूप आभार. आमची छोटी हर्षाली मल्होत्रा ऊर्फ मुन्नी आमच्या चित्रपटातील परी आणि करिना व नवाजुद्दीन तुमचेही खूप आभार, तुमच्यामुळे मला माझं स्वप्न पूर्ण करता आलं.”
करण जोहर काय म्हणालेला?
२२व्या स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात ‘बजरंगी भाईजान’ला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोत्कृष्ट बॅकग्राउंड स्कोअर यांसाठी पुरस्कार मिळाले होते. करण जोहर यावेळी या चित्रपटाबद्दल म्हणालेला, “बजरंगी भाईजाननं फक्त पैसे नाही कमावले तर तो या वर्षातील सर्वात मोठा चित्रपटही ठरला आहे.
दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालन करत असताना कपिल करणला म्हणालेला, “या वर्षातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार तुम्हाला मिळायला हवा.” त्यावर करण, “यावर्षी माझा चित्रपट रिलीज झाला नाही” असं म्हणाला, ज्यावर कपिल “म्हणूनच तुम्हाला मिळायला हवा, कारण काही कथा नसताना उगाच काहीतरी बनवण्याचा निर्णय घेतला नाही आणि निर्मात्यांना त्रास दिला नाही” असं म्हणाला.
