चित्रपटगृहात एकापेक्षा एक चित्रपट लवकरच हजेरी लावणार आहेत. यामध्ये श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि राजकुमार राव यांची मुख्य भूमिका असलेला 'स्त्री २' आणि अक्षय कुमार, वाणी कपूर, तापसी पन्नू, फरदीन खान यांची मुख्य भूमिका असलेला 'खेल खेल में' या चित्रपटांचा समावेश आहे. याबरोबरच, 'वेदा' हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोणत्या चित्रपटाने मारली बाजी? आता चित्रपटांच्या अॅडव्हाॅन्स बुकिंगला सुरुवात झाली असून 'स्त्री २' चित्रपटाने बाजी मारल्याचे दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेल्या 'स्त्री २' चित्रपटाची फक्त ४८ तासांत १,००,००० पेक्षा जास्त तिकिटांची विक्री झाली आहे. अॅडव्हाॅन्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने आतापर्यंत ४.०९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. शनिवारी निर्मात्यांनी चित्रपटाचे अॅडव्हाॅन्स बुकिंग सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. १४ ऑगस्टला हा चित्रपट रिलिज होणार असून संध्याकाळी ९.३० पासून नाइट शो सुरू होणार असल्याचे निर्मात्यांनी घोषित केले आहे. याबरोबर, या शर्यतीत असलेल्या 'खेल खेल में' या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त २,०४२ तिकिटांची विक्री केली. या अॅडव्हाॅन्स बुकिंगमधून चित्रपटाने ८.७४ लाख रुपयांची कमाई केली आहे. अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून त्याच्यासाठी ही चांगली बातमी नसल्याचे म्हटले जात आहे. याआधी अक्षय कुमारचे एकापाठोपाठ एक असे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत. हेही वाचा: इब्राहिम अलीबरोबर लेकीच्या अफेअरच्या चर्चांवर श्वेता तिवारीने सोडलं मौन, म्हणाली, “पलक आता…” आता 'खेल खेल में' या चित्रपटाची अॅडव्हाॅन्स बुकिंग फार झाली नसल्याने सिनेमा चित्रपटगृहात आल्यानंतर हा कमाल दाखवू शकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जॉन अब्राहमच्या 'वेदा' चित्रपटाने पहिल्या दिवशी अॅडव्हाॅन्स बुकिंगमध्ये ५,९६९ तिकिटांची विक्री करत १८.०७ लाख रुपयांची कमाई केली आहे. 'बॉलीवूड हंगामा'च्या एका अहवालानुसार, 'स्त्री २' सोमवारच्या रात्रीपर्यंत हृतिक रोशनच्या 'फायटर' या चित्रपटाच्या ॲडव्हाॅन्स बुकिंगला मागे टाकेल; तर मंगळवार रात्रीपर्यंत शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाच्या अॅडव्हाॅन्स बुकिंगला मागे टाकेल आणि बुधवारी रात्रीपर्यंत 'ब्रम्हास्त्र' आणि 'टायगर ३' या चित्रपटांच्या अॅडव्हाॅन्स बुकिंगला मागे टाकेल. या चित्रपटांनी अॅडव्हाॅन्स बुकिंगमध्ये ३,००,००० तिकिटे विकली होती. दरम्यान, 'स्त्री २' हा 'स्त्री' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. 'स्त्री' चित्रपटालादेखील प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले होते. आता अॅडव्हाॅन्स बुकिंगमध्येदेखील 'स्त्री २'ने बाजी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आता चित्रपट रिलिज झाल्यानंतर तो बॉक्स ऑफिसवर कमाल करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच, 'खेल खेल में' या चित्रपटात अक्षय कुमार बरोबर तापसी पन्नू, फरदीन खान, आदित्य सील, वाणी कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट कॉमेडी ड्रामा असून कोणाच्या फोनमध्ये कोणते गुपित लपले आहे, यावर आधारित आहे. सगळ्यांच्या फोनमध्ये असे काहीतरी आहे, जे त्यांनी त्यांच्या जोडीदारापासून लपवून ठेवले आहे, असे ट्रेलरमध्य़े पाहायला मिळाले होते. जेव्हा त्यांच्या फोनमधील गुपित बाहेर येते, त्यावेळी जोडीदार काय प्रतिक्रिया देणार हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.