‘स्त्री’ चित्रपटाचा पहिला भाग २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या भागाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल होता. चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूरने प्रमुख भूमिका साकारली होती. यानंतर प्रत्येकाच्या मनात ‘स्त्री’च्या दुसऱ्या भागाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. गेल्यावर्षी निर्मात्यांनी ‘स्त्री २’ चित्रपटाची घोषणा केली होती. अखेर शुक्रवारी ( १४ जून ) पोस्ट शेअर करत श्रद्धा कपूरने येत्या १५ ऑगस्टला ‘स्त्री २’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलं.

‘स्त्री २’ चित्रपटाचा टीझर सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘मुंज्या’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान ‘स्त्री २’चा टीझर दाखवण्यात येत आहे. बाहेर इतरत्र कुठेही हा टीझर प्रदर्शित करण्यात आलेला नाही. परंतु, टीझर रिलीज झाल्यावर पहिल्याच दिवशी हा ‘स्त्री २’चा टीझर ऑनलाइन लीक झाला.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार गेले होते अलिबागला! एकत्र केली धमाल, वनिता खरातच्या नवऱ्याने शेअर केला व्हिडीओ

‘स्त्री २’मध्ये कोणकोणते कलाकार झळकणार याची उत्सुकता प्रत्येकालाच होती. अखेर ऑनलाइन लीक झालेल्या टीझरमुळे श्रद्धाच्या ‘स्त्री २’मध्ये एक दाक्षिणात्य अभिनेत्री कॅमिओ करणार असल्याचं समोर आलं आहे. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे? जाणून घेऊयात…

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया ‘स्त्री २’मध्ये कॅमिओ करणार आहे. चित्रपटात तिचा एक स्पेशल डान्स नंबर असेल असं टीझर पाहिल्यावर लक्षात येत आहे. तमन्ना सध्या एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडत आहे. ‘जेलर’ मधील ‘कावला’ असो किंवा ‘अरनमनई ४’मधलं ‘अचाचो’… तमन्नाची ही गाणी सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंड झाली होती. आता ‘स्त्री २’च्या निमित्ताने तमन्नाच्या दिलखेचक अदा पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. ऑनलाइन लीक झालेला ‘स्त्री २’चा टीझर आता सगळ्या प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आला आहे.

हेही वाचा : दोन लग्नं, घटस्फोट अन् दुसऱ्या पतीवर जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवल्याचे आरोप; ३७ वर्षीय अभिनेत्री तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत

दरम्यान, ‘स्त्री २’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये श्रद्धा कपूरसह राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असतील. हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांना आता दुसऱ्या भागाकडून प्रचंड अपेक्षा आहेत.