ऐश्वर्या रायने १९९४ मध्ये ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला, तेव्हा ती फक्त २१ वर्षांची होती. ही सौंदर्यस्पर्धा जिंकल्यानंतर ऐश्वर्याचं आयुष्य बदललं. तिच्यासाठी अभिनयाचे दरवाजे खुले झाले. मिस वर्ल्ड होण्यापूर्वीच ऐश्वर्या एक यशस्वी मॉडेल होती. चित्रपट निर्माते तिला चित्रपटांच्या ऑफर देत होते. पण हा आंतरराष्ट्रीय किताब जिंकल्यानंतर, कोणत्याही चित्रपटात न झळकता ती सेलिब्रिटी झाली. सेलिब्रिटी स्टायलिस्ट ॲश्ले रेबेलो यांनी ऐश्वर्या यशस्वी होण्यापूर्वीच्या आठवणी सांगितल्या आहेत.

‘ऐश्वर्याला बॅकलेस ड्रेस घालताना संकोच वाटायचा’

‘बियॉन्ड द फ्रेम विथ अविनाश त्रिपाठी’ या पॉडकास्टवर बोलताना ॲश्ले रेबेलो यांनी एक प्रसंग सांगितला. ऐश्वर्याला बॅकलेस ड्रेस घालताना संकोच वाटत होता. ॲश्ले म्हणाले, “जेव्हा मी तिला पहिल्यांदा भेटलो, तेव्हा ती ‘ऐश्वर्या राय’ बनली नव्हती. ती फक्त एक साधी मुलगी होती. तिने केलेली पहिली जाहिरात एका सुटिंग ब्रँडची होती. त्या वेळी मी माझ्या बेडरूममध्येच कपड्यांचे ट्रायल्स घ्यायचो. ती माझ्या घरी ट्रायलसाठी आली होती, ती आमची पहिली भेट होती. तो एक बॅकलेस ड्रेस होता. तिने विचारलं ‘मला असा ड्रेस घालावा लागेल का?’ त्यावर मी ‘हो, त्यात काय अडचण आहे?’ असं म्हटलं होतं.”

“मला आठवतंय… ती खूप तरुण होती आणि कॉलेजमध्ये शिकत होती. ती ट्रायलसाठी तिच्या आईबरोबर आली होती. तिच्या आईला वाटले की तो ड्रेस खूपच रिव्हिलींग आहे. पण मी त्यांना म्हटलं, ‘नाही आंटी, काळजी करू नका. अशा जाहिरातींचं शूटिंग खूप सुंदर आणि कलात्मक पद्धतीने केलं जातं, त्यामुळे काही होणार नाही. शिवाय मीदेखील असेनच.’ मी त्यांना आधी ड्रेसची फिटिंग नीट पाहून घ्यायला सांगितलं. मग त्या तयार झाल्या आणि तेव्हापासूनच तिचा माझ्यावर विश्वास बसला,” असं ॲश्ले रेबेलो यांनी सांगितलं.

‘मी तिला मिस वर्ल्डसाठी २० साड्या दिल्या होत्या’

पुढे ॲश्ले रेबेलो व ऐश्वर्या यांचा चांगला बाँड झाला. जेव्हा ऐश्वर्या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेली होती, तेव्हा ॲश्ले यांनी तिच्यासाठी २० साड्या डिझाइन केल्या होत्या. “जेव्हा ती मिस वर्ल्डसाठी गेली, तेव्हा मी तिला २० साड्या दिल्या होत्या. मी तिच्यासाठी शिफॉनच्या राणी पिंक, पिवळ्या, निळ्या, काळ्या, पांढऱ्या आणि लाल अशा विविध रंगांच्या साड्या बनवल्या होत्या. त्याचबरोबर मी तिला भरपूर बांगड्या आणि साडीबरोबर मॅचिंग टिकल्याही दिल्या होत्या. तू रोज नाश्त्यासाठी खाली जाशील, तेव्हा दररोज एक नवीन साडी नेसायचीस, असं मी तिला सांगितलं होतं,” अशी आठवण ॲश्ले रेबेलो यांनी सांगितली.

ऐश्वर्या रायने स्पर्धेतून केलेला फोन

ॲश्ले रेबेलो यांनी दिलेला सल्ला ऐकल्याचा ऐश्वर्याला फायदा झाला होता. स्पर्धेतून ऐश्वर्याने त्यांना फोन केला आणि म्हणाली, “रोज सकाळी सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत असतात की आज मी कोणत्या रंगाची साडी नेसणार आहे. बरेच जण माझ्या टिकल्या, बांगड्या मागतात, त्यामुळे माझ्याकडील सर्व टिकल्या आणि बांगड्या संपल्या आहेत. माझी आई येणार आहे, तर प्लीज तिच्याबरोबर आणखी टिकल्या व बांगड्या पाठवा,” अशी आठवण ॲश्ले यांनी सांगितली. ऐश्वर्या फक्त सुंदरच नाही, तर स्वभावानेही खूप छान व्यक्ती आहे, असंही ॲश्ले यांनी नमूद केलं.

फक्त ५ हजारात ऐश्वर्याने केलेल्या जाहिराती

‘फिराक’, ‘फिर मिलेंगे’ आणि ‘पेज ३’ सारख्या चित्रपटांचे निर्माते शैलेंद्र सिंह यांनीही ऐश्वर्याच्या जाहिरातीच्या करिअरबद्दल वक्तव्य केलं. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मला आठवतंय, मी ऐश्वर्याला १८ किंवा १९ वर्षांची असताना मरीन ड्राइव्हवर पाहिलं होतं. रात्री ८:३० वाजता ती तिच्या आई-वडिलांसह मला आणि कुणाल कपूरला भेटायला आली होती. तेव्हा ती फक्त १८-१९ वर्षांची होती आणि तिने आमच्या पहिल्या तीन जाहिराती फक्त ५ हजार रुपयांत केल्या होत्या. तिने ‘घृत कुमारी हेअर ऑइल’ची जाहिरात केली आणि त्यानंतर अर्जुन रामपालबरोबर एक जाहिरात केली होती. अशा प्रकारे तिने तिच्या करिअरची सुरुवात केली होती.”