दिग्दर्शक सुभाष घई यांना सुरुवातीला १९९९ मध्ये आलेल्या ‘ताल’ चित्रपटातील मानसीच्या भूमिकेसाठी ऐश्वर्या रायला कास्ट करण्याबाबत साशंकता होती. साध्या, छोट्या शहरातील मुलीची भूमिका ऐश्वर्या साकारू शकेल का, असा प्रश्न त्यांच्या मनात होता. यामागचं कारण म्हणजे १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर ऐश्वर्याची कॉस्मेटिक इमेज तयार झाली होती.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुभाष घई यांनी या भूमिकेसाठी ऐश्वर्या रायच्या नावाची शिफारस दिवंगत नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी कशी केली, याचा किस्सा सांगितला. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सुभाष घई यांनी सांगितलं की, माधुरी दीक्षितशिवाय या भूमिकेसाठी आवश्यक असलेलं आव्हानात्मक नृत्य कोणती अभिनेत्री उत्तम प्रकारे करू शकेल, असा प्रश्न त्यांनी सरोज खान यांना विचारला होता.
ऐश्वर्या तर कॉस्मेटिकच्या जगातली – सुभाष घई
सुभाष घई पुढे म्हणाले, “सरोज खान यांनी तिचं नाव सुचवलं. मी त्यांना विचारलं की, सध्या ३-४ अभिनेत्री आहेत, त्यापैकी उत्तम नृत्य कोण करतं? त्यांनी ऐश्वर्या रायचं नाव घेतलं. मला धक्काच बसला. मी त्यांना म्हणालो की, ऐश्वर्या तर कॉस्मेटिकच्या जगातली आहे”.
अशी झाली ऐश्वर्याची तालसाठी निवड
सुभाष घई यांनी पुढे सांगितलं की, सुरुवातीला त्यांना ऐश्वर्या राय ही मॉडेलिंग आणि सौंदर्यस्पर्धांच्या जगाशी अधिक संबंधित अभिनेत्री वाटत होती. मात्र, मणिरत्नम यांच्या ‘इरुवर’ या चित्रपटातील तिचा अभिनय पाहिल्यानंतर त्यांचा दृष्टिकोन बदलला. “मी तिचे एक-दोन चित्रपट पाहिले होते. त्यामुळे ती मॉडेलिंग आणि कॉस्मेटिकशी अधिक परिचीत असल्याची वाटली. माझ्या एका मित्राने मला मणिरत्नम यांचा तिचा चित्रपट पाहायला सांगितला. जेव्हा मी हा तमिळ चित्रपट पाहिला, तेव्हा मला जाणवलं की, हीच ती मुलगी आहे. मी ऐश्वर्याला सांगितलं की, सुरुवातीला तुझ्या चेहऱ्यावर अजिबात मेकअप नसेल. त्यानंतर हळूहळू मेकअप वाढत जाईल”
सुभाष घई यांनी ऐश्वर्या रायच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेचं कौतुक केलं. तसेच, कलाकारांनी दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवणं किती महत्त्वाचं आहे, यावरही त्यांनी भाष्य केलं.ते म्हणाले, “जेव्हा एखादा अभिनेता स्वतःला दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनानुसार पूर्णपणे झोकून देतो, तेव्हा चांगल्या गोष्टी घडतात. कलाकारांनी दिग्दर्शकावर विश्वास ठेवून स्वतःला त्याच्या हाती सोपवलं पाहिजे. अमिताभ बच्चन नेहमी मला सांगायचे की, ते दिग्दर्शकाची मेहनत आणि त्याची चित्रपटाविषयीची जिद्द पाहतात. त्यामुळे चित्रपटाची कथा फक्त दोन ओळी ऐकूनही ते होकार द्यायचे, कारण तो त्या दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. अनेक स्टार्सची समस्या अशी असते की, ते स्वतःला क्रिएटिव्ह पार्टनर बनवण्याचा प्रयत्न करतात. ऐश्वर्या राय,अनिल कपूर आणि अक्षय खन्ना या तिघांनीही स्वतःला दिग्दर्शकाच्या हाती सोपवलं. ऐश्वर्या खूप मेहनती होती”.
१९९९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ताल’ या म्युझिकल रोमँटिक चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मिती सुभाष घई यांनी केली होती. या चित्रपटात ऐश्वर्या रायबरोबर अक्षय खन्नानेही काम केलं होतं. याशिवाय अमरीश पुरी आणि आलोक नाथ हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत होते. चित्रपटाला ए.आर रहमान यांनी संगीत दिलं होतं.
