दिग्दर्शक सुभाष घई यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक ठरलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘खलनायक’च्या आठवणींना उजाळा दिला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तो वादांच्या भोवऱ्यात सापडला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुभाष घई यांनी ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्याविरोधात झालेली मोठी आंदोलने, गाण्याबाबत न्यायालयाच्या निर्णयाची लागलेली चिंता, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही काळ आधी संजय दत्तला झालेली अटक आणि बाळासाहेब ठाकरेंनी केलेली मदत याबद्दल सांगितलं आह.
१९९३ मध्ये प्रदर्शित झालेला संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ अभिनीत ‘खलनायक’ पुढे बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी नैतिकतेच्या मुद्द्यावरून झालेला विरोध, कायदेशीर लढाई आणि मुख्य अभिनेता संजय दत्तच्याभोवती निर्माण झालेला वाद यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. चित्रपटातील सर्वात गाजलेल्या ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्यावर तब्बल ‘३२ संस्थांनी आक्षेप घेतला होता. त्याच काळात एप्रिल १९९३ मध्ये TADA आणि Arms Act अंतर्गत संजय दत्तला अटक झाली.
मला ३२ संस्थांच्या प्रतिनिधींना भेटावं लागलं – सुभाष घई
सुभाष घई यांनी सांगितलं की, ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्याला झालेला विरोध इतका तीव्र होता की, अनेक संघटनांनी ‘खलनायक’च्या प्रदर्शनाला विरोध करत चित्रपटावर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घई यांना तब्बल ३२ संस्थांच्या प्रतिनिधींना भेटावं लागलं. सुभाष घई म्हणाले, “या गाण्याच्या विरोधात ३२ संघटना होत्या आणि त्यांना चित्रपटाचं प्रदर्शन थांबवायचं होतं. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. या सर्व ३२ संघटनांच्या प्रतिनिधींना मला भेटावं लागलं. पुणे आणि दिल्लीमध्ये आंदोलनं सुरू झाली होती, विशेषतः महिला संघटनांकडून जास्त विरोध होता. मी त्यांना सांगितलं, किमान आधी चित्रपट पाहा. तुम्हाला वाटतंय तसं या चित्रपटात काहीही नाही, पण त्यांनी मला उत्तर दिलं, असं प्रत्येकजण म्हणतो. हे गाणं खूप अश्लील आहे.”
बाळासाहेब ठाकरेंनी केलेली मदत
सुभाष घई यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेनेचे कार्यकर्तेही या गाण्याच्या विरोधातील आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. सुभाष घई म्हणाले, “शिवसेनेचे लोकही याच्या विरोधात उभे होते. त्यामुळे मी बाळासाहेब ठाकरेंकडे गेलो. मी त्यांना सांगितलं, माझा खलनायक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कृपया एकदा चित्रपट पाहा. त्यांनी चित्रपट पाहिला आणि दुसऱ्याच दिवशी शिवसेनेच्या वृत्तपत्रात सामनामध्ये लिहिलं की, लोकांना या चित्रपटाचा हवा तसा अर्थ लावता येईल; मात्र चित्रपट चांगला आहे आणि चोली के पीछे जे आहे, ते चोलीच्या मागेच आहे. बाळासाहेब ठाकरेंनी यानंतर संपूर्ण शिवसेनेला खडसावलं आणि त्यामुळे चित्रपटाच्या विरोधातील वातावरण बदललं.”
सेन्सॉर बोर्ड गाण्यावर आक्षेप घेईल अशी भीती वाटत होती
सुभाष घई यांनी सांगितलं की, या वादामुळे ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणं चित्रपटातून काढून टाकलं जाईल, अशी त्यांना भीती होती. मात्र, गाणं रेकॉर्ड करताना किंवा त्याचं चित्रीकरण करताना निर्माते किंवा टीममधील कोणालाही ते अश्लील वाटलं नव्हतं, असं त्यांनी सांगितलं. सुभाष घई म्हणाले, “मला भीती होती की सेन्सॉर बोर्ड हे गाणं कापेल, पण त्यांनी तसं केलं नाही. आम्ही जेव्हा हे गाणं रेकॉर्ड केलं आणि शूट केलं, तेव्हा कोणालाही ते अश्लील वाटलं नव्हतं. आम्ही त्याकडे एक लोकगीत म्हणून पाहिलं होतं. बिहारच्या काही भागांमध्ये महिला एकत्र अशी गाणी गातात काकू, भाच्या, सगळ्याजणी. चित्रपटातील परिस्थिती पाहता, माझ्यासाठी हे गाणं खूप महत्त्वाचं होतं.”
सुभाष घई यांनी यापूर्वीही ‘चोली के पीछे क्या है’ हे लोकगीत असल्याचं सांगत स्पष्टीकरण दिलं होतं. सुभाष घई यांनी सांगितलं की, गाण्याबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच त्यांनी दिल्लीत चित्रपटाचा प्रीमियर आयोजित केला होता. सुभाष घई म्हणाले, “मला अशी भीती होती की सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला मंजुरी दिली असली, तरी न्यायालयाने कदाचित चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी नाकारली असती. मी दिल्लीत प्रीमियर आयोजित केला होता आणि शेखर कपूर, जे. पी. दत्ता आणि एन. चंद्रा यांच्यासह आठ-दहा दिग्दर्शक मित्रांना आमंत्रित केलं होतं. प्रीमियर संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होणार होता. मात्र, ५.३० वाजेपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी द्यायची की नाही, यावर न्यायालयात सुनावणी सुरूच होती. अखेर ६.३० वाजता न्यायालयाचा निकाल आला आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी मिळाली. त्यानंतर ६.३० वाजताच प्रीमियर सुरू झाला.”
