सलमान खान बॉलीवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहे जो अनेकदा त्याच्या खासगी व व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अनेकदा त्याचे काही कलाकार, निर्माते व दिग्दर्शक यांच्याबरोबर वाद झाल्याचं म्हटलं जातं. अशातच आता लोकप्रिय दिग्दर्शक सुभाष घई यांनी त्याच्याबरोबर झालेल्या वादाबद्दल सांगितलं आहे.
‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत सुभाष घई यांनी २००८ मध्ये आलेल्या ‘युवराज’ चित्रपटासाठी सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. ते म्हणाले, “युवराजसाठी सलमान खानचा भाऊ माझ्याकडे आला आणि म्हणाला, तुम्ही सलमानबरोबर चित्रपट का बनवत नाही? त्यावर मी विचारलं, सलमानला खरंच माझ्याबरोबर काम करण्यात रस आहे का? कारण मी यापूर्वी त्याच्याबरोबर कधीच काम केलं नव्हतं. त्यावर त्याने सांगितलं की, त्याला काम करण्याची इच्छा आहे.” यानंतर सुभाष घई यांनी चित्रपटाची कथा लिहिली. “माझ्यासमोर नेहमी एक आव्हान असतं की, एखाद्या अभिनेत्याला त्याने यापूर्वी कधीही न साकारलेली भूमिका द्यायची” असं त्यांनी सांगितलं. सलमान खानसोबत अनिल कपूर आणि कतरिना कैफ यांच्याही प्रमुख भूमिका असलेल्या ‘युवराज’ चित्रपटाला मात्र बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही. चित्रपट प्रेक्षकांवर विशेष प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला.
सलमान खानमुळे चित्रपट झाला फ्लॉप – सुभाष घई
चित्रपट नेमका कुठे कमी पडला, याचं विश्लेषण करताना सुभाष घई यांनी सलमान खानची स्टार इमेजच त्याच्या व्यक्तिरेखेसाठी अडथळा ठरली असावी, असं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “काही वेळा व्यक्तिरेखा प्रभावी ठरत नाहीत, कारण स्टारची प्रतिमा त्या व्यक्तिरेखेवर हावी होते. अभिनेता व्यक्तिरेखा साकारण्याऐवजी स्वतःचीच भूमिका साकारतो. एका ठरावीक टप्प्यानंतर स्टार्स स्वतःच्याच प्रतिमेचं कॅरिकेचर बनतात. तुम्ही स्वतःलाच किती वेळा पुन्हा साकारणार?” पुढे अमिताभ बच्चन यांचं उदाहरण देत ते म्हणाले, “अमिताभ बच्चन सरांनी इतक्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, त्यांना सलाम”.
समलान खानबरोबर झालेली झटापट
याच मुलाखतीत सुभाष घई यांनी सलमान खानबरोबरची मैत्री आणि त्यानंतर दोघांनी एकत्र काम करण्यापर्यंतचा किस्साही सांगितला. ‘युवराज’च्या आधी दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. या घटनेची आठवण सांगताना सुभाष घई म्हणाले, “चित्रपट करण्याआधी आमच्यात भांडण झालं होतं. आमच्यात झटापट झाली होती. त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला चांगलंच सुनावलं.” या वादाची सुरुवात नेमकी कशी झाली, याबद्दल सुभाष घई यांनी सांगितलं की, “आम्ही एका पार्टीत होतो. सलमान नशेत होता. तो काही चुकीचं बोलत होता, तेव्हा मी त्याला असं बोलू नकोस असं सांगितलं. त्याला माझ्याबद्दल काहीतरी राग होता. त्याने मला विचारलं, तुम्ही हे का केलं? ते का केलं? त्यावर मी सांगितलं की, मी दिग्दर्शक आहे आणि हा माझा निर्णय आहे. त्यानंतर त्याने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मी त्याला तसं न करण्यास सांगितलं. तिथेच आमच्यात वाद झाला.”
हा वाद इतका वाढला की अखेर सलीम खान यांनी हस्तक्षेप करत मुलगा सलमान आणि सुभाष घई यांच्यातील गैरसमज दूर केला. या घटनेची आठवण सांगताना सुभाष घई म्हणाले, “दुसऱ्याच दिवशी सकाळी सलीम साहेबांनी मला फोन केला. त्यांनी सांगितलं की, सलमानने त्याच्या आईला घडलेला सगळा प्रकार सांगितला होता. ते म्हणाले, मी त्याला चांगलंच सुनावलं आहे. त्यानंतर त्यांनी सलमानला माझी माफी मागण्यासाठी माझ्या घरी पाठवलं. तो माझ्याकडे आला आणि नम्रपणे माफी मागितली.”
सलमानने वडिलांचं ऐकून आपली चूक स्वीकारल्याचं पाहून सुभाष घई यांना त्याच्याबद्दल आपुलकी वाटली. “त्याला वडिलांबद्दल इतका आदर आहे, हे पाहून मला छान वाटलं. त्यामुळे मी तो विषय तिथेच सोडून दिला. त्यानंतर आम्ही एकमेकांच्या घरी नेहमी जायचो आणि पुढे आम्ही एकत्र चित्रपटही केला” असं घई यांनी सांगितलं. सुभाष घई यांनी यापूर्वीही अनेकदा सलमान खानचं कौतुक केलं आहे ‘वाइल्डफिल्म्सइंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सलमानच्या धैर्याचं कौतुक करत म्हटलं होतं, “सलमान खान कोणत्याही परिस्थितीत घाबरत नाही. त्याच्या आयुष्यात कितीही संकटं आणि अडचणी आल्या, तरी तो कदाचित दुःखी होईल, पण कधीच घाबरणार नाही.”
